Maharashtrachi Hasyajatra Fame Actress : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून अनेक विनोदी कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले. समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे यांसारख्या दिग्गज विनोदवीरांबरोबरच अनेक नवोदित कलाकारसुद्धा या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यापैकीच एक विनोदी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर.

पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणून प्रियदर्शिनी या शोमधून घराघरात पोहोचली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करीत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिची बहीण मधुमती हिच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर केला होता. ‘गाडी नंबर 1760’ चित्रपटाच्या प्रीमियरला मधुमतीने हजेरी लावली होती.

मधुमती ही प्रियदर्शिनीची चुलतबहीण आहे आणि तिला डाऊन सिंड्रोम असून, ती स्पेशल ऑलिम्पिकमध्ये खेळली आहे. इतकेच नव्हे, तर तिने भारतासाठी रौप्यपदकही आणले आहे. याबद्दल स्वत: मधुमती आणि प्रियदर्शिनीने सांगितले आहे. दोन्ही बहिणींनी नुकताच ‘Uniqueness with This – Ability’ या यूट्यूब वाहिनीशी संवाद साधला. यावेळी दोघींनी त्यांच्या खास नात्याबद्दलची माहिती दिली.

यावेळी प्रियदर्शिनी म्हणाली, “स्पेशल ऑलिम्पिकमध्ये बोची (Bocce) या खेळात मधुमतीला रौप्यपदक मिळालं आहे. हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जाlतो; पण मधुमतीनं तो स्वतंत्रपणे खेळला होता आणि त्यात तिनं भारतासाठी रौप्यपदक आणलं आहे. हा खेळ खेळण्यासाठी ती पहिल्यांदा एकटी परदेशात गेली होती. या खेळात ती मेडल आणेल, असं आम्हाला वाटलं नव्हतं; पण तिनं ते केलं. तिकडे तिनं सगळ्या ट्रेनिंगला चांगलाच प्रतिसाद दिला. कोणाच्याही मदतीशिवाय ती स्वत:च खेळली. ती क्षमता तिच्यात आहे. फक्त आपण अशा मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे.” तसेच या मुलाखतीत प्रियदर्शिनीने मधुमती अभिनेत्री असल्याचेही सांगितले.

दरम्यान, प्रियदर्शिनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्रेक्षकांना हसवण्याचे काम करतेच. त्यासह ती काही चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘फुलराणी’, ‘नवरदेव Bsc. Agri.’, ‘रुखवत’, ‘सोयरीक’ अशा काही चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच लवकरच ती ‘दशावतार’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.