झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’चं नवं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. शनिवारी (२६ जुलै) ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाचा पहिला भाग प्रसारित झाला. १० वर्षं अविरतपणे मनोरंजन केलेला हा कार्यक्रम छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या पर्वात कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव व ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम गौरव मोरेसुद्धा आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील गौरव मोरेसह आणखी एक अभिनेता ‘चला हवा येऊ द्या’चा भाग आहे, हा अभिनेता म्हणजे निमिश कुलकर्णी. महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अनेक विनोदी स्किट्समधून निमिषने प्रेक्षकांना हासवण्याचं काम केलं आहे. मात्र, ‘चला हवा येऊ द्या’मध्ये निमिश अभिनेत्याच्या भूमिकेत नाही, तर दिग्दर्शनाची भूमिका पार पाडत आहे. याबद्दल त्याने स्वत:च खुलासा केला आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत निमिशने सांगितलं की, तोसुद्धा चला हवा येऊ द्या या शोचा भाग आहे. पण, या शोमध्ये तो अभिनय करीत नसून दिग्दर्शकीय टीममध्ये आहे. या शोच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे आणि त्याच्या या पदर्पणाबद्दल त्याने अल्ट्रा मराठी बझ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्याबद्दल निमिश असं म्हणाला, “कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला दिग्दर्शनात रस होता. त्यामुळे यात पुढे जाऊन काहीतरी करायचं हे डोक्यात होतं. अशातच काही महिन्यांपूर्वी थेट तुमच्या घरातून हे नाटक आलं, त्यात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार राऊत हे कलाकार आहेत, तर या नाटकाच्या निमित्ताने प्रसाददादानं मला विचारलं की, तू या नाटकासाठी मला दिग्दर्शनात मदत करशील का? त्यावर मी लगेच हो म्हटलं. तेव्हा त्या २५-३० दिवसांमध्ये मला जाणवलं की, हे मला आवडतंय.त्यामुळे मला यात अजून पुढे प्रयत्न करायला हवेत. त्याच वेळी माझ्यापुढे संधी चालून आणि मी ती संधी लगेच घेतली.”
पुढे तो म्हणतो, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सारखा शो मी केला असल्याने, त्याच प्रकारचा किंवा त्याच्याशी साम्य असलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा शो येणार होता. त्यात मला माझ्या आवडत्या दिग्दर्शन या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली. या शोमध्ये मी दिग्दर्शकाच्या भूमिकेत असणार आहे. त्यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि याचं मला दडपणही आहे.”
निमिश कुलकर्णी इन्स्टाग्राम पोस्ट
त्यानंतर अभिनेता असं म्हणाला, “गौरव मोरेसुद्धा ‘चला हवा येऊ द्या’मध्ये आहे. मी जेव्हा त्याला पहिल्या दिवशी भेटलो; तेव्हा आम्ही फक्त यामुळे खुश होतो की, आपण काहीतरी उत्तम करू पाहतोय. यापुढील प्रवासातसुद्धा आपलं काम नीट व्हावं हाच हेतू असणार आहे. कारण- कोणत्याही कार्यक्रमात काम करणं… मग ते अभिनय असो, दिग्दर्शन असो किंवा लेखन असो… ते काम महत्त्वाचं असतं, ते काम किती चांगलं होईल इतकाच भाव मनात असतो.”