Maharashtrachi Hasyajatra Fame Namrata Sambherao : मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे त्यांच्या अभिनयाबरोबरच साधेपणामुळेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. मराठी इंडस्ट्रीमधील कलाकारांचा साधपेणा चाहत्यांना भावतो. पडद्यावर मोठं स्टारडम असलं तरी, आपल्या वैयक्तिक आयुष्यात मात्र ही कलाकार मंडळी अगदी सामान्यपणे वागताना दिसतात. अशीच लोकप्रिय आणि प्रसिद्ध तरी तितकीच साधेपणा जपणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी नम्रता संभेराव, तिच्या विनोदी अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे. या शोमधील तिचे अनेक विनोदी स्किट्स आणि त्यातल्या अनेक भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोबरोबरच सध्या ती ‘थेट तुमच्या घरातून’ हे नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त संपूर्ण टीमसह नम्रता नुकतीच कोल्हापुरला गेली होती.

कोल्हापूरच्या दौऱ्यावरून सांगलीला जाताना उशीर झाल्याने संपूर्ण नाटकाच्या टीमच्या दुपारच्या जेवणाची भ्रांत झाली. मात्र यावर उपाय म्हणून नम्रताने चक्क एका धाब्याच्या स्वयंपाकघरात जाऊन टीमसाठी स्वत: जेवण बनवलं. याचा खास व्हिडीओ तिचा सहकलाकार आणि अभिनेता प्रसाद खांडेकरने शेअर केला आहे. या व्हिडीओमधून त्याने नम्रताने नाटकाच्या सर्व टीमसाठी जेवण बनवल्याची झलक शेअर केली आहे.

नम्रता सर्वांसाठी जेवण बनवतानाचा व्हिडीओ शेअर करत प्रसाद असं म्हणतो, “अन्नपूर्णा नम्रता… सांगलीच्या प्रयोगासाठी जाताना शॉपिंगमुळे थोडा उशीर झाला आणि जेवणाचे वांदे झाले. जवळजवळ सगळ्या हॉटेल्समधील शेफ लंच-टाईम होऊन गेल्यामुळे निघून गेलेले. मग शेवटी एका ढाब्यावर मालकाची परवानगी घेऊन आमच्या नमाने (नम्रता) थेट किचनचा ताबा घेतला.”

प्रसादने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये थेट तुमच्या घरातून’ नाटकातील भक्ती देसाई, ओंकार राऊत, भाग्यश्री मिलिंद आणि श्रमेश बेटकर हे बाहेर बसलेले दिसत आहेत. तर नम्रता या सर्वांसाठी ढाब्याच्या स्वयंपाकघरात झुणका बनवत आहे. या व्हिडीओमध्ये ती असं म्हणते, “सांगलीच्या प्रयोगासाठी चाललोय, हॉटेलमध्ये शेफ नाहीयेत आणि भूकही लागली आहे. खूप शॉपिंग केल्यानंतर आता पाच वाजले आहेत. काही खाल्लं नाहीय, त्यामुळे सर्वांसही झुणका बनवत आहे.”

दरम्यान, प्रसादने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नम्रताने माझं आवडतं काम अशी कमेंट केली आहे. तसंच अनेक चाहत्यांनीसुद्धा या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेक चाहत्यांनी नम्रताच्या या साधेपणाबद्दल तिचं कौतुक केलं आहे.