‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रताने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. आता ती वेगवेगळ्या चित्रपटात, नाटकात विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे. नुकतीच नम्रता संभेरावने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने ‘झी चित्र गौरव २०२५’चा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतरचा अनुभव लिहीला आहे.

नम्रता संभेरावने पुरस्काराबरोबरचे काही फोटो शेअर करत लिहिलं आहे, “…आणि ते ‘झी चित्र गौरव’चं गाणं वाजलं माझ्यासाठी, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री नम्रता संभेराव चित्रपट ‘नाच गं घुमा’ त्या क्षणी पोटात गोळा आला. आनंद, सुख, समाधान सगळं एकवटून आलं. हे लहानपणी टीव्हीवर बघितलं होतं, कोणाला पारितोषिक मिळालं की डोळ्यात पाणी यायचं. मग ते अनोळखी असलं तरी आणि तो दिवस माझ्या आयुष्यात आला.”

पुढे नम्रताने लिहिलं की, भरत जाधव सरांनी नाव पुकारलं नमु, अंगावर सरसरून काटा आला. विनोदाचे महारथी भरत जाधव सरांकडून मला पुरस्कार मिळाला, खूपच भारी वाटलं. समोर विनोदाचे बाप बसले होते, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे काय बोलावं साठवून ठेवावा असा क्षण. २० वर्ष झाली, सिने नाट्यसृष्टीत छोट्या मोठ्या भूमिका करत इथंवर पोहोचले. गर्दीतून हळूहळू अनेक अनुभवांसह शिकत स्वतःला पुढे ढकलत आज प्रमुख भूमिकेसाठी बक्षीस मिळवलं. प्रामाणिकपणे कलेवर प्रेम केलं, करत राहीन.

“‘झी चित्र गौरव’च्या सर्व परीक्षकांचे मनापासून आभार. आशाच्या भूमिकेसाठी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला ते म्हणजे परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी या दोन अत्यंत हुशार हरहुन्नरी व्यक्तींनी. तुमचे सुद्धा खूप खूप आभार. मुक्ता ताई माझं प्रेरणास्थान तुझेही आभार. ‘नाच गं घुमा’च्या सगळ्या समूहाचे, निर्मात्यांचे मनापासून आभार. या सगळ्यात तुमचाही मोठा वाटा आहे आणि प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार,” असं नम्रता संभेरावने लिहिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नम्रता संभेरावच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच प्रदर्शित होणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात झळकणार आहे. २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात तिचा कॅमिओ असणार आहे. याशिवाय दुसऱ्या बाजूला तिच्या ‘थेट तुमच्या घरातून’ नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या नाटकात नम्रतासह प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, शिवाली परब, प्रथमेश शिवलकर आणि भक्ती देसाई आहे.