Maharashtrachi Hasyajatra Fame Actor Bhajan Video : राज्यभरात गेले दहा दिवस गणेशोत्सवानिमित्त आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी लाडका बाप्पा विराजमान झाला होता. बाप्पाची सर्व भक्तांनी मनोभावे पूजा केली. तसंच त्याच्यासाठी भजन आणि आरत्यासुद्धा केल्या. मुंबईसह कोकणात गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

दरवर्षी अनेक मुंबईकर गणपतीसाठी आपल्या मूळ गावी कोकणात जातात. यंदाच्या वर्षी छाया कदम, तितीक्षा तावडे, खुशबू तावडेसह अनेक कलाकार गणपतीसाठी कोकणात गेल्याचं पाहायला मिळालं. आपल्या सोशल मीडियाद्वारे या कलाकारांनी त्यांच्या कोकणातील गणेशोत्सवाची खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली.

अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरचा. यंदा गणपतीसाठी प्रसाद खांडेकरसुद्धा आपल्या कोकणातल्या गावी गेला असून भजनात दंग झाल्याचा एक व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद गळ्यात टाळ अडकवून भजन गाण्यात दंग झाल्याचं पाहायला मिळत आहे.

“गणपतीमधलं गावचं भजन म्हटलं की, एकदम काळजाला हात घालणारा विषय. आवडती गोष्ट भजन”, अशी कॅप्शन देत प्रसादने हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसाद गात असलेल्या भजनात त्याला गावकऱ्यांचीही साथ मिळाल्याचं या व्हिडीओमधून दिसत आहे. प्रसादने शेअर केलेला हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओखाली चाहत्यांनी तशा प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केल्या आहेत.

प्रसाद खांडेकर इन्स्टाग्राम व्हिडीओ

नम्रता संभेराव आणि निखिल बने यांनी व्हिडीओखाली “वा बुवा” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच “जमिनीवर पाय असलेला कलाकार प्रसाद भाऊ”, “अतिशय सुंदर”, “हा जो आनंद आहे, तो कुठेही शोधला तरी मिळत नाही”, “याला म्हणतात खरा कोकणी माणूस” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी प्रसादच्या साधेपणाचं कौतुकही केलं आहे.

दरम्यान, प्रसाद खांडेकर या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याच्या कामानिमित्तची माहिती तसंच काही खास प्रसंगं, आठवणी वा किस्से शेअर करताना दिसतो. अशातच त्याने गावच्या गणपतीत भजन गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसाद हा अभिनेता असण्याबरोबरच लेखक आणि दिग्दर्शकसुद्धा आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.