छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भऱभरुन प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमातून अनेक हास्यवीर प्रसिद्धीझोतात आले. या कलाकारांपैकीच एक म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसादने आपल्या अभिनय आणि विनोदाच्या शैलीवर प्रेक्षकांमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर प्रसाद मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. निरनिराळे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो.
अभिनयाबरोबर प्रसाद आपल्या कुटुंबालाही तितकाच वेळ देताना दिसतो. आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो प्रसाद सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतो. प्रसादएवढाच त्याचा मुलगा श्लोकही नेहमी चर्चेत असतो. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्लोकनेही अभिनयक्षेत्रात पदापर्ण केले आहे. नुकताच श्लोकचा वाढदिवस झाला. लाडक्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा-
प्रसादने श्लोकबरोबरचे काही फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअऱ करत त्याने लिहिलं “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्लोक. तू ७ वर्षांचा झालास आणि याच वर्षी “एकदा येऊन तर बघा” या चित्रपटातून तू छोटीशी भूमिका करुन या क्षेत्रात पदार्पण केलं आहेस. दिग्दर्शक म्हणून माझा पहिला चित्रपट व अभिनेता म्हणून तुझाही हा पहिलाच चित्रपट. माझ्या नाटकाचे प्रयोग तुला पुन्हा-पुन्हा पाहायचे असतात आणि फक्त बघत नाहीस, तर आधीच्या प्रयोगात न घेतलेली एखादी एडिशन लगेच पकडतोस, आम्ही विसरलेल्या डायलॉगची पण तू आठवण करून देतोस. मी सकाळी लवकर शूटला निघतो, तेव्हासुद्धा तू झोपलेला असतोस आणि पॅकअप नंतर उशिरा घरी येतो तेव्हसुद्धा तू झोपलेला असतोस. पण त्या झोपेतसुद्धा माझ्या गळ्याभोवती तुझ्या इवल्याश्या हातांची घडी करून आणि पाय अंगावर टाकून जेव्हा घट्ट मिठी मारतोस तेव्हा सगळा थकवा निघून जातो.”
प्रसादने पुढे लिहिलं “जगातील कुठली ही मसाज-मशीन जेवढं बॉडीला शांत करू शकत नाही तेवढं तुझ्या एका मिठीने साध्य होत. तुझा डान्स करताना त्या ठेक्यावर होणारं तुझं पदलालित्य. डान्स करताना एक्सप्रेशन वर भर दे म्हटलं म्हणून क्षणाक्षणाला तुझे बदलणारे हावभाव. लिपसिंक मॅच करायला तू केलेले प्रयत्न हे सगळं बघताना भारी वाटत. आपल्याला येणारा कॉम्प्लेक्स हा कधीच कोणाला आवडत नाही. पण तुझं इंग्रजी ऐकताना मला येणारा कॉम्प्लेक्स हा खूपच हवाहवासा वाटतो. श्लोक तू तुझ्या बालपणाचा आनंद घे. कारण तुझं लहान असण्याचा घरातील प्रत्येकजण आनंद घेत आहे. बाकी ममा, आई, ममी आई आणि आपलं सगळं कुटुंबाचा तू जीव आहेस. जेवढं ते तुझ्यावर प्रेम करतात त्यापेक्षा तुझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते वर्षानुवर्षे ते अजून वाढू देत. बाकी तुझा बाबा तुझ्याबरोबर आहेच श्लोक तुला खूप खूप प्रेम.”
प्रसादची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. तसेच अभिनेता अभिजित चव्हाण, अभिनेत्री नम्रता संभेराव व संगीतकार रोहन प्रधान यांनी श्लोकला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.