Samir Choughule Shares How Wife Support Him in His Career : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे समीर चौघुले. उत्तम अभिनय आणि लिखाणाच्या खास कौशल्याने समीर यांचे आज जगभरात अनेक चाहते आहेत. आपल्या विनोदी शैलीने सर्वत्र कौतुकास पात्र ठरणाऱ्या समीर यांचा यामागे बराच मोठा संघर्ष आहेत.

लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी एकेकाळी नोकरीही सोडली होती. मात्र या कठीण काळात त्यांना आपल्या पत्नीची साथ मिळाली. या कठीण काळात पत्नी कविता यांनी संसार सांभाळल्यामुळे समीर त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू शकले आहे. पत्नीच्या या संघर्षाबद्दल समीर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली.

सोनी मराठीच्या MHJ Unplugged या कार्यक्रमात समीर म्हणाले, “कॉलेजमध्ये असताना कविता आयुष्यात आली. मित्र विश्वास सोहनीने त्यावेळी खूप मदत केली. आपण देवाकडे प्रामाणिकपणे एखादी गोष्ट मागितल्यानंतर तथास्तू म्हणतो आणि तो जे देतो, ते म्हणजे कविता आहे. मला कविता आवडायची हे मी विश्वासला सांगितलं होतं. त्यामुळे मी हिरो आणि ती हिरोईन असलेली एखादी एकांकिका मला दे असं मी त्याला म्हटलं होतं. यानिमित्ताने आमची रोज रिहर्सल होईल आणि तिचा सहवास मला मिळू शकेल.”

यानंतर समीर म्हणाले, “तेव्हा प्रेमाची व्याख्याच वेगळी होती. नुसता सहवाससुद्धा पुरेसा असायचा. ती खूप साधी आहे. ती सोशल मीडियावरसुद्धा नाही. ती आहे म्हणून आयुष्यात खूप गोष्टी मिळाल्या आहेत आणि मिळत आहेत. कुठलीतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते, जिच्यामुळेच आपलं अस्तित्व असतं. तशी माझ्या आयुष्यात कविता आहे. तिच्याबद्दल मी फार काही बोलत नाही. पण तिचं अस्तित्व आहे; म्हणून माझं अस्तित्व आहे. नाहीतर हा समीर चौघुले झीरो आहे, हे मी ठामपणे सांगतो.”

यापुढे समीर यांनी त्यांच्या संघर्ष काळाबद्दल सांगितलं की, “मी नोकरी सोडली, तेव्हा ती माझ्या पाठीशी उभी होती. ती म्हणाली, तुझ उत्पन्न नाही ना… मी नोकरी करते. आपण आपले खर्च कमी करू. आजही आमचे खर्च कमीच आहेत. तिने हे सांगितल्यावर मला खूप आधार मिळाला आणि मी फार जोमाने या क्षेत्रात काम करायला लागलो. त्यावेळी तिचा पाठिंबा मिळणं खूप गरजेचं होतं. तेव्हा तिने मला हे सांगितलं की, ‘तू तुझी स्वप्नं पूर्ण कर. बाकी कसला विचार करू नकोस. आपल्याला तीन-चार वर्षांचा मुलगा आहे, तेव्हा आई गेलेली होती. घरी बाबा होते. या सगळ्याचा विचार करू नकोस. फक्त तुझ्या स्वप्नांचा विचार कर. या क्षेत्रात तू उशीरा आला आहेस. पण ठीक आहे, आता तुझी स्वप्नं पूर्ण कर, बाकी सगळं मी बघते.’ कोणीतरी हे सांगणं खूप गरजेचं असतं आणि आता तर या क्षणाला माझं कविताशिवाय पानही हलत नाही. मी आता तिच्यावर खूप अवलंबून आहे.”

यापुढे समीर चौघुले सांगतात, “ज्यावेळी मी नोकरीला होतो तेव्हा मी फर्स्ट क्लासने प्रवास करायचो. तेव्हा कंपनी पैसे द्यायची. पण नोकरी सोडल्यानंतर फर्स्ट क्लासने प्रवास करायचा हा प्रश्न होता, तेव्ह फर्स्ट क्लासचा पास हा साधारण दीड हजार वगैरे होता आणि साधा पास कदाचित २५० च्या आसपास होता. तेव्हा मी सेकंड क्लासने प्रवास करायचा असं ठरवलं पण कविता म्हणाली, नाही मी तुला पैसे देते तू फर्स्ट क्लासनेच जा. पण कधीकधी मी सेकंड क्लासने प्रवास करायचो आणि तिला सांगायचोच नाही. कारणतिला वाईट वाटू नये. या गोष्टी कधी आपण कुणाला सांगत नाही कारण या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या खासगी गोष्टी आहेत. प्रत्येकाचा हा संघर्ष चालूच असतो.”