‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमामधून घराघरांत पोहोचलेल्या कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे पृथ्वीक प्रताप. पृथ्वीकला या कार्यक्रमामुळे एक वेगळीच ओळख मिळाली. अगदी सामान्य कुटुंबातून नावारुपाला आलेला हा कलाकार कमी कालावधीतच लोकप्रिय ठरला. सोशल मीडियाच्या माध्यमातून पृथ्वीक व्यक्त होताना दिसतो. पण त्याचबरोबरीने काही मुलाखतींमध्येही त्याने त्याच्या खासगी आयुष्याबाबत उल्लेख केला आहे.

पृथ्वीक जवळपास एक वर्षांचा असतानाच त्याने वडिलांना गमावलं. आता ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने वडिलांना एक भावनिक फोन केला आहे. पृथ्वीक म्हणाला की, “मला जन्म दिल्याबद्दल तुमचे आभार. आपलं फारसं कधीच बोलणंच झालं नाही. तुम्ही प्रिंटींग प्रेसमध्ये कामाला होतात असं मला आईकडून कळालं. तुमचं प्रिटींग प्रेसचं आयडी अजूनही माझ्याकडे आहे. ते मी पाकिटात ठेवतो”.

आणखी वाचा – धमाल-मस्ती, हॉट लूक, अन्…; बॉयफ्रेंडसह सई ताम्हणकरचं स्पेनमध्ये जोरदार बर्थडे सेलिब्रेशन, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

“तुम्ही खूप कमी वेळ घरी असायचात. याचाच आईला खूप त्रास व्हायचा. तुम्ही केईएम रुग्णालयामध्ये होता आणि आई पुण्यामध्ये होती. तेव्हा तुम्हाला भेटण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनवेळा आईला मुंबईमध्ये यायला लागत होतं. तेव्हा तिला अधिक त्रास व्हायचा. तुमची तिथे कोण काळजी घेणार की नाही ही चिंता तिला असायची. तुम्हाला ती पत्र पाठवायची”.

आणखी वाचा – “१५०० रुपये मानधन सांगून ७०० रुपये दिले अन्…” संकर्षण कऱ्हाडेने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव, म्हणाला, “मी ते पैसे त्यांच्या…”

View this post on Instagram

A post shared by PRITHVIK PRATAP (@prithvikpratap)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पण आईला तुम्ही खूप सांभाळून घेतल्याबद्दल तुमचे आभार. यापुढे मी आईला सांभाळेन तुम्ही त्याची काळजी करु नका. मी सदैव तिच्याबरोबर आहे. दादा आणि माझ्यासाठीच कदाचित तुम्ही आम्हाला सोडून गेला असाल. पण तुमचं जाणं व्यर्थ ठरलेलं नाही. जितकी लोकं तुम्हाला ओळखतात तितक्या लोकांना माहिती आहे की तुम्ही माझे बाबा आहात. फक्त जमलं तर कधीतरी या. एखाद्या चित्रपटात स्वर्गामध्ये असणारी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला भेटते असं दाखवतात. तसं जर तुम्हाला कधी भेटता आलं तर या. जास्त काही नाही फक्त एक मिठी मारा. डोक्यावर हात ठेवा आणि म्हणा अभिमान वाटतो जे करतोस ते करत राहा, चांगलं करतो”. पृथ्वीकला वडिलांबाबत बोलताना अश्रु अनावर झाले.