Colors TV Manpasand Ki Shaadi Hindi Serial Promo : मराठी कलाविश्वातील बहुतांश कलाकार हिंदी, गुजरातीसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसत आहेत. याशिवाय लवकरच सुरू होणाऱ्या ‘कलर्स वाहिनी’वरील हिंदी मालिकेत बहुतांश मराठी कलाकारांची वर्णी लागल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
‘कलर्स हिंदी’ वाहिनीवर लवकरच ‘मनपसंद की शादी’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकार एकत्र झळकणार आहेत. या मालिकेचं नाव आहे ‘मनपसंद की शादी’. ही हिंदी मालिका असली तरी, यातील कुटुंब मराठी पार्श्वभूमी असल्याचं दाखवण्यात आलं आहे. अभिनेत्री ईशा सूर्यवंशी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे.
हिंदी मालिकेत झळकणार ‘हे’ मराठी कलाकार
‘मनपसंद की शादी’ या हिंगी मालिकेत ‘आई कुठे काय करते’ फेम लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. ते यात ईशा सूर्यवंशीच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. तसेच ‘ठरलं तर मग’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या लोकप्रिय मालिकांच्या निर्मात्या व मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या मालिकेत ईशाच्या आईची भूमिका साकारतील.
मिलिंद गवळी, सुचित्रा बांदेकर यांच्यासह या मालिकेत स्वाती देवल आणि इरावती लागू या मराठी अभिनेत्री देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.
प्रोमोमध्ये नायिकेसाठी मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी तिचे आई-बाबा सतत धडपड करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. यावर त्यांची मुलगी, “मी माझ्या आवडीच्या मुलाशी लग्न करू शकते का? कारण मला जावई नकोय तुम्हाला सांभाळणारा मुलगा हवाय” असं म्हणताना दिसतेय. आता नायिकेच्या स्वप्नातील राजकुमार तिला कधी, कसा व कुठे भेटणार हा रोमँटिक प्रवास ‘मनपसंद की शादी’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘मनपसंद की शादी’ मालिकेचा प्रोमो
दरम्यान, ‘मनपसंद की शादी’ ही मालिका ११ ऑगस्ट पासून सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता कलर्स हिंदी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.