Marathi Actor Angry Video : मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे अभिनय क्षेत्रात काम करण्याबरोबरच समाजभानही जपताना दिसतात. आजूबाजूच्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर ते बिनधास्त आणि बेधडकपणे आपली मतं व्यक्त करताना दिसतात. रोजच्या दैनंदिन आयुष्यातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आणि समस्यांबद्दलही ते आवाज उठवताना दिसतात.

असाच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर निर्भीडपणे व्यक्त होणारा, प्रश्न विचारणारा अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आस्ताद हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याची कामाबद्दलची माहिती शेअर करतोच; याशिवाय तो अनेक सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरही आपली स्पष्ट मतं व्यक्त करत असतो. काल (६ जुलै, २०२५) त्याने घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल प्रशासनावर टीका केली होती.

अशातच आस्तादने पुन्हा ठाण्यावरून मुंबईत येणाऱ्या रस्त्यावरील खड्डे तसंच ब्रिजवर दिवे (लाइट्स) नसल्याबद्दल राग व्यक्त केला आहे. तसंच त्याने याबद्दल नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना प्रश्न विचारले आहेत. या व्हिडीओत आस्ताद म्हणतो, “नमस्कार! याआधी मी घोडबंदर रोडच्या रमणीय खड्ड्यांबद्दल एक व्हिडीओ शेअर केला होता. आता इथून मुंबईत शिरतानाची काही अप्रतिम दृश्ये दाखवू इच्छितो.”

यापुढे आस्ताद म्हणतो, “नितीन गडकरी काका, देवेंद्र काका, एकनाथराव काका… मी तुम्हाला साहेब म्हणू शकत नाही, कारण एकतर तुम्ही जनतेचे सेवक आहात. लोकांनी तुम्हाला राज्य चालवण्यासाठी आणि जनतेच्या सोईसुविधांकडे लक्ष देण्यासाठी निवडून दिलं आहे; त्यामुळे वयाचा मान राखत मी तुम्हाला काका म्हणत आहे. तर आता आपण मीरा-भाईंदर परिसरात शिरत आहोत. इथे उजवीकडे एखाद्या किल्ल्याची भिंत वाटावी असं बांधकाम केलं आहे; तो खरंतर एक फ्लायओव्हर बांधला जात आहे. पण याचं काम गेले अडीच महिने बंद आहे, हे मी स्वतः बघत आहे. अर्धवट काम करून ते बंद केलं आहे.”

यानंतर आस्ताद मीरा-भाईंदर परिसरातील ब्रिजची काही दृश्ये दाखवत असं म्हणतो, “आता पुढे खरी जादू सुरू होते, ती बृहन्मुंबई महानगरपालिकेची… जिथे मीरा-भाईंदर ब्रिज संपतो, तिथून एक रस्ता जातो तो काशिमीरा ब्रिजजवळ… इथे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. खड्ड्यांच्या आसपास तो पुतळा आहे. महाराज हतबल होऊन त्यांच्याच महाराष्ट्राल्या राज्यकर्त्यांचा कारभार पाहत आहेत. काशिमीराच्या ब्रिजवर खड्डे तर आहेतच; पण या ब्रिजवरील एकही लाईट सुरू नाही. म्हणजे आपल्या आयुष्यातला थरार पदोपदी आणि पावलोपावली किती वाढवायचा याची काळजी हे प्रशासन घेत आहे.”

यानंतर तो असं म्हणतो, “मी मुंबई महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो, तुमच्यामुळे आम्हाला आमच्या आयुष्याची किंमत रोज कळते. आम्ही स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून कमावलेल्या गाडीची, त्यात तुम्हालाही भरघोस टॅक्स दिल्याची किंमत आम्हाला पदोपदी कळते. या ब्रिजवरचा एकही लाईट सुरू नाही. पण, ब्रिज संपल्यानंतर मात्र लखलखाट दिसू लागतो.”

आस्ताद काळे इन्स्टाग्राम व्हिडीओ

यापुढे आस्तादने असं म्हटलं, “नितीन गडकरी काका, देवेंद्र फडणवीस काका, एकनाथ शिंदे काका, अजित पवार काका आणि महाराष्ट्र विधानसभेत बसलेल्या सर्वच २८८ काका-काकू, मामा-मावश्यांचे मी आभार मानतो, इतक्या सोयी-सुविधा तुम्ही दिल्या आहेत. त्यात गाडी चालवताना रेल्वेने प्रवास केल्याचा अनुभव मिळतो, कारण ब्रिजवरील प्रत्येक जॉईंट्सवर तुम्हाला एक हादरा बसतो; तर महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, भारत सरकार या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद.”