सोशल मीडियाच्या या काळात ट्रोलिंग हे आता अगदी सामान्य झालं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया आणि ट्रोलिंग हे जणू काही समीकरणच झालं आहे. त्यात कलाकार मंडळींना तर या सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

सोशल मीडियावर मराठी कलाकार अगदी काहीही शेअर करो, ट्रोलर्स मंडळी या कलाकारांना ट्रोल करण्यासाठी तयारच असतात. काही कलाकार मंडळी या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात, पण काही कलाकार मात्र या ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतात. अशातच नुकतंच एका अभिनेत्यानेही त्याला ट्रोल करणाऱ्या ट्रोलरचा समाचार घेतला आहे.

मराठी अभिनेता अभिजीत केळकरने नुकताच सोशल मीडियावर शेतीकामाचा व्हिडीओ शेअर केला. अभिनेत्याने कोकणातील भातलावणीचा खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओसह त्याने भातलावणीचा अनुभवही शेअर केला होता. त्याच्या या कृतीचं अनेकांनी कौतुक केलं होतं. मात्र या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने खोचक कमेंट करत ट्रोल केलं आहे.

अभिजीत केळकर इन्स्टाग्राम व्हिडीओ

एका नेटकऱ्याने अभिजीतने शेअर केलेल्या व्हिडीओखाली “शेती करण्याची ही कोणती पद्धत?” अशी कमेंट केली. नेटकऱ्याच्या या कमेंटला अभिजीतनेही अगदी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. अभिजीतने नेटकऱ्याला “इन्स्टाग्रामवर बसून, नुसतं वाईट कमेंट्स करून शेती करण्याची ही पद्धत कळणार नाही, इन्स्टाग्रामवर चिखल करण्यापेक्षा खऱ्या चिखलात उतरून बघ, लगेच कळेल” असं उत्तर दिलं आहे.

अभिजीत केळकरच्या व्हिडीओखालील कमेंटचा स्क्रीनशॉट
अभिजीत केळकरच्या व्हिडीओखालील कमेंटचा स्क्रीनशॉट

दरम्यान, अभिजीत केळकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने भातलावणीचा व्हिडीओ शेअर करत त्याने “शेतीचे कष्ट काय असतात हे अनुभवण्यासाठी गेल्यावर्षीही आलो होतो आणि यावर्षी पुन्हा आलो आहे. हा अनुभव शब्दांत सांगता येण्यासारखा नाही. हा अनुभव अवर्णनीय आहे. खूप मज्जा येत आहे.” असं म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिजीतने शेअर केलेल्या व्हिडीओवर “मातीशी नाळ जोडलेली म्हणतात ना ते हेच”, “अभिनयात उंची असलेला आणि जमिनीवर पाय असेलेला अभिनेता”, “खूप छान”, “एकदम कडक”, “मस्तच” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. मात्र या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने खोचक कमेंट करत त्याला ट्रोल केलं आहे.