कोकण म्हणजे जणू स्वर्गच आहे, त्यात पावसाळ्यात कोकणाचं सौंदर्य हे आणखीनच खुलतं. त्यामुळे पावसाळा सुरु झाला की, सर्वांना कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचे वेध लागतात. कोकणात सध्या भातलावणीचीही लगबग सुरू असते. अनेक चाकरमानी आपल्या गावी जात भातलावणी करतात. अशातच एक मराठी अभिनेताही कोकणात भातलावणीसाठी पोहोचला आहे आणि या भातलावणीचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.
अभिनेता अभिजीत केळकर हा भातलावणीसाठी कोकणात पोहोचला आहे आणि याची खास झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिजीत हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या कामाबद्दलची माहिती आणि त्याचे काही खास अनुभव वा प्रसंग शेअर करत असतो. अशातच त्याने शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेता गेल्या वर्षीही कोकणात भातलावणीसाठी गेला होता. यावेळी त्याने भर पावसात भातलावणी केली होती. अशातच त्याचा यंदाचा भातलावणीचा व्हिडीओही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत हातात नांगर घेत दोन बैलांच्या साथीने चिखलात नांगरणी करत आहे. तसंच हातात भाताची रोपं घेत तो चिखलात त्याची लावणी करत आहे
अभिजीत केळकर इन्स्टाग्राम व्हिडीओ
या व्हिडीओमधून अभिजीतने त्याचा हा भातलावणीचा अनुभवही शेअर केला आहे. याबद्दल तो असं म्हणतो, “खाऊन माजा, टाकून माजू नका असं माझी आजी म्हणायची. तेच मी माझ्या मुलांना सांगत असतो. अन्नाचा प्रत्येक कण पिकवण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे माझ्या आजीला माहीत होतं. त्यामुळे ती नेहमीच सांगायची की, अन्नाचा आदर करा. खाऊन माजा पण टाकून माजू नका.”
यानंतर त्याने असं म्हटलंय, “शेतीचे कष्ट काय असतात हे अनुभवण्यासाठी गेल्यावर्षीही आलो होतो आणि यावर्षी पुन्हा आलो आहे. हा अनुभव शब्दांत सांगता येण्यासारखा नाही. हा अनुभव अवर्णनीय आहे. खूप मज्जा येत आहे.” याशिवाय हा व्हिडीओ शेअर करत अभिजीतने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘कोकणात जन्म घ्यायला आणि यायला नशीब असावं लागतं’ असं म्हटलं आहे. अभिजीतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याचं याबद्दल कौतुक केलं आहे.
अभिजीतने शेअर केलेल्या व्हिडीओवर “मातीशी नाळ जोडलेली म्हणतात ना ते हेच”, “अभिनयात उंची असलेला आणि जमिनीवर पाय असेलेला अभिनेता”, “खूप छान”, “एकदम कडक”, “मस्तच” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे, तर अभिनेत्री मेघा धाडेनेही त्याच्या व्हिडीओवर ‘बेस्ट थेरपी’ अशी कमेंट केली आहे. दरम्यान, अभिजीतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.