Marathi Actor Supports Atharva Sudame : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेच्या एका रील व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवानिमित्त हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणारा व्हिडिओ अथर्वने शेअर केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याच्यावर प्रचंड टीका होऊ लागली त्यामुळे अथर्वने हा व्हिडीओ डिलीट केला आहे. त्याचबरोबर याप्रकरणी त्याने माफीसुद्धा मागितली आहे.
अथर्वच्या या रील व्हिडीओसंदर्भात आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी ‘एक्स’ ( आधीचं ट्विटर ) पोस्ट शेअर करत सुदामेची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. आता या पाठोपाठ मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अभिजीत केळकरने देखील अथर्वला पाठिंबा दिला आहे.
अभिजीत केळकर काय म्हणाला?
“माझ्या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम… युद्धात देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, संरक्षणाची जबाबदारी सक्षमतेने पार पाडणाऱ्या सोफिया कुरेशी, सनई वादक उस्ताद बिस्मिल्लाह खान, तबलानवाज उस्ताद अल्लारखा खान, झाकीर हुसेन, ए आर रेहमान, सानिया मिर्झा, महाराजांचं संरक्षण करणारे सय्यद बंडा, तिन्ही खान, रफी साहेब, युसूफ खान, मधुबाला, नर्गिस, मीना कुमारी आणि असे अनंत… यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम, आदर, अभिमान असेल आणि त्यांच्यावर प्रेम करताना त्यांचा धर्म कुठला हा विचार आपल्या मनातही येत नसेल… मला गरज पडली तर माझ्यासाठी ज्याने रक्तदान केलं, डॉक्टर म्हणून उपचार केले, जेवताना ते धान्य ज्याने पिकवलं तो कुठल्या धर्माचा, जातीचा आहे हे मला विचारावंसं ही वाटत नसेल… तर मग आपण जिला बुद्धिची देवता मानतो अशा गणपती बाप्पाची मूर्ती कोणी घडवली आहे, त्या माणसाची जात, धर्म कुठला आहे याचा मला का फरक पडावा? मी ब्राह्मण जातीत जन्माला आलो यात माझं काहीही कर्तृत्व नाही, ना माझ्या आई-वडिलांनी जात पात मानण्याचे संस्कार माझ्यावर केले… सरकारी ठिकाणी, कागदपत्रांवर जात, धर्म लिहावा लागतो म्हणून नाईलाजाने मी तो लिहितो / लिहावा लागतो… जन्माने मिळालेला माझा हिंदू धर्म, जन्माने मला मिळालेली ब्राह्मण ही माझी जात, मला कुठलाही भेदभाव किंवा द्वेष करायला शिकवत नाही… उलट माझा हिंदू धर्म मला, वसुधैव कुटुंबकम हीच शिकवण देतो… हे असं असताना जर अथर्व सुदामे हाच संदेश आपल्या व्हिडिओतून देत असेल तर तो आपल्यातल्याच काही लोकांना का खटकावा?” असा सवाल अभिजीतने त्याच्या पोस्टमध्ये उपस्थित केला आहे.

अथर्वने शेअर केलेला व्हिडीओ नेमका काय होता?
अथर्व, गणेशोत्सवानिमित्त गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी जातो. त्यातली एक मूर्ती अथर्व बूक करतो. यावेळी मूर्तीकाराचा मुलगा त्याला अब्बू अशी हाक मारतो. तेवढ्यात मूर्तीकार अथर्वला सांगतो की, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता. पण, अथर्व त्याला सांगतो… मला तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे. पुढे तो म्हणतो, “माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही. तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील…” या रीलवरुन अथर्व सुदामेवर हिंदुत्वाद्यांकडून टीका करण्यात आली. त्यामुळे माफी मागून अथर्वने हा व्हिडीओ आता डिलिट केला आहे.