Akshay Kelkar Mehendi Ceremony : दिव्या पुगांवकर, अभिषेक रहाळकर असे मराठी टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकार गेल्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. तर, काही कलाकारांनी सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली देत लवकरच लग्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावर्षी लग्नबंधनात अडकणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याचं नाव जोडलं जाणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकरने काही महिन्यांपूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल केला होता. तो गेल्या १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. आता १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अक्षय लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याने मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. अक्षयने आयुष्याची गाडी संपूर्णत: रुळावर आल्याशिवाय कोणाला आपल्या प्रेमाबद्दल सांगायचं नाही असं ठरवलं होतं आणि यामुळेच अभिनेत्याने तब्बल १० वर्षे त्याचं रिलेशनशिप चाहत्यांपासून गुपित ठेवलं होतं.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अक्षय केळकरने त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल करत होणाऱ्या बायकोची ओळख सर्वांना करून दिली. अक्षयच्या आयुष्यातली रमा म्हणजे साधना काकटकर. ही एक लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. मेतरा, आनंदाचे गाव, नाखवा यांसह अक्षयच्या अनेक गाण्यांना साधनाने तिचा आवाज दिला आहे. साधनाची ओळख सर्वांना करून दिल्यावर, काही दिवसांपूर्वीच या दोघांचं केळवण अभिनेत्री समृद्धी केळकरने थाटमाटात केलं होतं. आता अक्षय-साधनाच्या मेहंदी सोहळ्याला सुरुवात झाली असून, याचे फोटो अभिनेत्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मेहंदी सोहळ्यासाठी अक्षय आणि साधना यांनी ‘Twinning’ केल्याचं पाहायला मिळत आहे. “मेहंदी in process…” असं कॅप्शन अभिनेत्याने या फोटोंना दिलं आहे. अक्षयच्या फोटोंवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता अभिनेता लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, अक्षयच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच तो ‘कलर्स मराठी’च्या ‘अबीर गुलाल’ मालिकेत झळकला होता. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. याशिवाय अक्षय केळकर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता देखील आहे.