‘सुंदर मी होणार’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अमोल बावडेकरला रविवारी प्रयोगाआधी हृदयविकाराचा झटका आल्याने या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला. हा प्रयोग विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. सध्या अमोल बावडेकरची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आली आहे.

या नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अमोलच्या प्रकृतीबद्दल समजल्यावर रविवारचा प्रयोग तात्काळ रद्द करण्यात आला आणि निर्मात्यांनी प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत केले. आता अमोलच्या जागी पुढचे काही दिवस या नाटकात अभिनेता अनिरुद्ध जोशी झळकणार आहे, असं दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं आहे.

दिग्दर्शक पोस्ट शेअर करत लिहितात, “रविवारी सकाळी ‘सुंदर मी होणार’ या नाटकाच्या प्रयोगाला काही तास उरले असतानाच अभिनेते अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आला. अमोल यांच्या पत्नी प्रेरणा बावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावरही बावडेकर यांनी डॉक्टरांना विनंती केली की, “मला फक्त तीन तासांची परवानगी द्या. मी प्रयोग करून येतो आणि मग तुम्ही माझी शस्त्रक्रिया करा.”

“मात्र, डॉक्टरांनी अर्थात याला परवानगी दिली नाही. त्यामुळे दीनानाथ नाट्यगृहातील जवळपास हाऊसफुल्ल प्रयोग रद्द करावा लागला. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असला तरी, ते लवकरच ‘सुंदर मी होणार’ या नाटकाच्या प्रयोगांसाठी परत येतील.” असं दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अमोल बावडेकरच्या अनुपस्थितीत नाटकाचे पुढील काही प्रयोग अभिनेता अनिरुद्ध जोशी करेल अशी माहितीही निर्मात्यांनी दिली आहे. याशिवाय अमोल सध्या ‘तुला जपणार आहे’ या ‘झी मराठी’च्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका देखील साकारत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, सुंदर मी होणार या नाटकाविषयी सांगायचं झालं तर, पु. ल. देशपांडे यांचं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल तीस वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर आलं आहे. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘अभिजात’ प्रकाशित या नाटकाची दिग्दर्शकीय धुरा राजेश देशपांडे सांभाळत आहेत. विद्याधर जोशी, अभिजीत चव्हाण, स्वानंदी टिकेकर, सृजन देशपांडे, श्रुती पाटील, विराजस ओढेकर, आस्ताद काळे, श्रुजा प्रभुदेसाई असे अनेक कलाकार या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.