Jyoti Chandekar : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी पुण्यात निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच मराठी कलाकारांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ५३ वर्षांच्या प्रगल्भ कारकिर्दीत ज्योती चांदेकर यांनी मराठी मालिका, नाटक, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनानंतर अनेक मराठी कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर करत आपलं दु:ख व्यक्त केलं होतं. याशिवाय काही कलाकारांनी ज्योती चांदेकरांबद्दल हृदयस्पर्शी आठवणी शेअर केल्याचं पाहायला मिळालं.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेल्या ‘येक नंबर’ सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेता धैर्य घोलपने नुकतीच ज्योती चांदेकरांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. तुझ्या पोटी जन्म घेतला नसला तरी तू यशोदेप्रमाणे माझा सांभाळ केलास…तू होतीस, तू आहेस आणि कायम राहशील असं म्हणत धैर्यने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

धैर्य घोलपची भावनिक पोस्ट

तू माझ्या पोटी जन्माला आला असतास तर रोज मार खाल्ला असतास माझा… हे ठरलेलं वाक्य असायचं तुझं.

ज्या गोष्टी मी कोणत्याही मित्र मैत्रिणीसोबत बोललो नाहीये अशा असंख्य गोष्टी मी तुझ्यासोबत Disscus केल्या, त्यातून तू तटस्थपणे मला मार्गदर्शन केलंस. वैयक्तिक आयुष्य किंवा व्यावसायिक आयुष्य असो त्यात योग्य वेळी योग्य सल्ले दिलेस ज्यातून माझं भलंच झालं.

ज्यांच्यासोबत आपलं पटतं त्यांच्या अचानक Exit ने सुद्धा एक प्रकारचा क्लोजर मिळालेला असतो कारण लास्ट मेमरी ही चांगली असते .
पण ज्यांच्यासोबत आपलं लव्ह-हेट रिलेशनशिप असतं त्यांना अलविदा देखील म्हणता येत नाही याचं जास्त वाईट वाटतं .
हा विषय वेगळा की आपल्याला अजून एक दिवस देवाने बोनस दिला जरी, तरी आपण भांडलोच असतो (few things never change ) नाही का?

आपले खूप हिशोब बाकी आहेत, खूप गप्पा बाकी आहेत, खूप मदभेद बाकी आहेत
जेव्हा तुझ्याकडे येईल तेव्हा ते पूर्ण करू. तोपर्यंत काळजी घे.

ज्योती माझ्या आयुष्यात तू,
देवकी नव्हतीस पण तरीही यशोदा होऊन माझा सांभाळ केलास.
त्याबद्दल मी तुझ्या कायम ऋणात राहीन.

तू होतीस ,तू आहेस आणि राहशील कायम माझ्यासोबत…
–तुझा बब्या

दरम्यान, ज्योती चांदेकर यांनी गेल्यावर्षी स्वत:साठी नवीन गाडी खरेदी केली होती. यावेळी सुद्धा त्यांचं कौतुक करण्यासाठी धैर्य आवर्जून उपस्थित होता. ज्योती चांदेकर यांच्या पश्चात दोन मुली आहेत. पोर्णिमा पंडित-पुलन आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित. ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या मायलेकींनी ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटादरम्यान एकत्र काम केलं होतं. तर, पोर्णिमा पहिल्यापासून कलाविश्वापासून दूर आहे.