Gaurav More Reaction On Trolling : सोशल मीडियावर आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल अनेक नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. मात्र अलीकडे सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोलिंग करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेक कलाकारांना नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर ट्रोलिंग केलं जातं. सोशल मीडियावरील ट्रोलिंगकडे काही कलाकार दुर्लक्ष करताना दिसतात. मात्र काहीजण या ट्रोलर्सना त्यांच्या योग्य ती उत्तरं देतात.
अशातच अभिनेता गौरव मोरेनेही सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनेत्याने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ट्रोलर्सना थेट शब्दांत सुनावलं. तसंच तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसल्यास त्यावर वाईट कमेंट करण्यापेक्षा स्क्रोल करा आणि पुढे जा असंही म्हटलं.
याबद्दल गौरव मोरे असं म्हणाला, “त्या ट्रोलर्सना मी फिल्टरपाड्यात घेऊन जाईन आणि बोलेल आता मला ट्रोल कर. तुझ्यात किती डेरिंग आहे ते मला दाखव. मी बऱ्याच जणांना बोललो आहे, तुम्ही राहता तिकडे मी येतो. तुम्ही फक्त माझ्या फिल्टरपाड्यात यायचं आणि इथून घरी जायचं. आम्हाला माहीत आहे. आमचा जन्म तिकडे गेला आहे, आम्ही सगळं बघितलं आहे. हे ट्रोलर्स आता आले आहेत; आम्ही मोठे-मोठे भाई बघितले आहेत.”
यापुढे अभिनेता म्हणतो, “माझा परिसर काय आहे ते मला माहीत आहे. तुम्हाला (ट्रोलर्स) एखादी गोष्ट आवडली नाही किंवा पटली नाही तर तुम्ही स्क्रोल करून पुढे जा ना… कमेंट कशाला करता? मी बऱ्याचदा याबद्दल बोललो आहे आणि मला त्याचं वाईट वाटतं, इतक्या त्या कमेंट्स घाणेरड्या असतात… एखादी हिरोईन किंवा मुलीला वाईट कमेंट करतात. समजा एखाद्या मुलीने घातलेला ड्रेस तुम्हाला आवडला नसेल, तर तुम्ही कमेंट करु नका ना… स्क्रोल करा आणि पुढे जा… मला त्या गोष्टीचा राग येतो.”
यापुढे गौरव म्हणतो, “तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही चिडत आहात की काय? तेच कळत नाही. प्रत्येकाचं व्यक्तीस्वातंत्र्य आहे ना… कोणी काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही ठरवू नका… घाणेरडी कमेंट करणं गरजेचं आहे का? चांगली मतंही व्यक्त करता येतात ना… मला खासकरून मुलींबद्दलच्या कमेंट्सबद्दल वाईट वाटतं. कारण मी त्या कमेंट्स वाचल्या आहेत. तेव्हा असं वाटतं की, आता या लोकांना काय बोलणार… पण हे समोरासमोर आले पाहिजेत, मग यांना बघता येईल.”
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून गौरव मोरे घराघरांत पोहोचला. मात्र मध्यंतरी त्याने या शोमधून निरोप घेतला. यानंतर तो ‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी विनोदी कार्यक्रमात सहभाग घेतला. यादरम्यान, त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या ट्रोलिंगबद्दल त्याने वेळोवेळी त्याचे स्पष्ट मतं व्यक्त केली होती. अशातच आता त्याने पुन्हा एकदा ट्रोलिंगवर त्याचं मत व्यक्त केलं आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमांनंतर आता गौरव ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये गौरव श्रेया बुगडे, प्रियदर्शन जाधव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे या गँगलीडर्सपैकी एक असणार आहे. हा शो आज म्हणजेच २६ जुलैपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.