‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे किरण माने. सध्या किरण माने हे ‘कलर्स मराठी’वरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकताना दिसत आहे. यात ते सिंधुताईच्या वडिलांची म्हणजेच अभिमान साठे यांची भूमिका साकारली आहे. नुकतंच किरण माने यांनी मालिकेतील पहिल्या सीनबद्दल भाष्य केले आहे.

किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच किरण माने यांनी त्यांच्या ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेतील पहिल्या सीनबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा : सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर हेमंत ढोमेची पोस्ट, म्हणाला “फारच…”

किरण माने यांची पोस्ट

“…पहिलाच सीन. सिंधुताईंचे वडिल अभिमान साठेंच्या रूपात मी तुकोबारायांचा अभंग म्हणतोय… “कर कटावरी, तुळशीच्या माळा… ऐसे रूप डोळा दावी हरी !” …आणि ज्यांनी माझ्यात तुकोबाराया रूजवला, मुरवला, भिनवला ते डाॅ.आ.ह. साळुंखे तात्या आवर्जुन सिरीयल पहायला बसलेत !

…माझ्यासाठी अनमोल असलेला हा क्षण राकेशनं कॅमेऱ्यात टिपला आणि मला पाठवला. पाठमोरे तात्या हेडफोन लावून माझी सिरीयल पहातायत हे पाहून डोळ्यांत पाणी तरळलं. एपिसोड संपल्या-संपल्या आ.ह.तात्यांचा लांबलचक मेसेज आला. “अफलातून ! तुमचा अभिनय जबरदस्त आणि वऱ्हाडी भाषा तुमच्या तोंडी फक्कड ! हिंदी भाषेत सांगायचे, तर ‘आप तो परदे पर छा गये ।’ फारच छान. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !”

मी नि:शब्द झालो. गळा दाटून आला. इतके दिवस, आत… खूप आत दाबून ठेवलेली वेदना, एखाद्या जिवलगाने मायेचा स्पर्श करताच जशी धबधब्यासारखी बाहेर उसळते तसं काहीसं झालं…भावनांना वाट मोकळी करून दिली. गेल्या दीड वर्षांतले सगळे आघात, अपमान, अवहेलना सगळं सगळं धुवून निघाल्यासारखं लख्ख, शुभ्र काहीतरी वाटायला लागलं. भानावर येऊन मी तात्यांना रिप्लाय केला “खूप आभार” लग्गेच तात्यांचा पुन्हा मेसेज आला : “पुन्हा कधी आभार मानू नका. संत तुकाराम हा तर आपणा दोघांना घट्ट जोडणारा दुवा आहे. तुमची भूमिका पाहणे आनंदाचे आहे. चेहऱ्यावरचे भाव आणि एकूण अभिव्यक्ती खिळवून ठेवते.”

बास ! अजून काय पायजे भावांनो. आता पुढच्या संघर्षासाठी परत ताजातवाना झालोय. सज्ज झालोय. “तुका म्हणे सुख झालें माझ्या जीवा । रंगलो केशवा तुझ्या रंगे ॥”, असे किरण माने यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाई पाहिल्यानंतर केदार शिंदे म्हणाले, “आता गर्दी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान किरण माने यांच्या पोस्टवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी मालिकेतील अभिनय आवडला, असे कमेंट करत सांगितले आहे.