Marathi Actor Rutwik Talwalkar Engagement : आपले आवडते सेलिब्रिटी वैयक्तिक आयुष्यात काय करतात, ते खऱ्या आयुष्यात कसे आहेत? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते. अलीकडच्या काळातील बहुतांश सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मालिकाविश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमाची कबुली दिली होती. आता या अभिनेत्याचा साखरपुडा पार पडला आहे. तो कोण आहे जाणून घेऊयात…

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. याशिवाय ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा आघाडीवर असते. काही दिवसांपूर्वी या मालिकेतील लोकप्रिय मुख्य अभिनेता अक्षर कोठारी विवाहबंधनात अडकला होता. आता याच मालिकेतील आणखी एका अभिनेत्याने प्रेक्षकांना गुडन्यूज दिली आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अद्वैतच्या भावाची म्हणजेच सोहम चांदेकरची भूमिका लोकप्रिय अभिनेता ऋत्विक तळवलकर साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच ऋत्विकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. ऋत्विकच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे अनुष्का चंदक. यावेळी अभिनेत्याने त्यांच्या पोस्टमध्ये तो ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं नमूद केलं होतं. आता त्याचा साखरपुडा पार पडला आहे.

Rutwik Talwalkar Engagement
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेत्याचा साखरपुडा ( Rutwik Talwalkar Engagement )

चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ऋत्विक आणि अनुष्का या दोघांनीही आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करत साखरपुडा केला आहे. ऋत्विकने यावेळी काळ्या रंगाचा थ्री पिस ब्लेझर सूट घातल्याचं पाहायला मिळालं. तर, अनुष्काने व्हाइट कलरची सुंदर अशी डिझायनर साडी नेसली होती. मराठी कलाविश्वातून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

दरम्यान, ऋत्विक तळवलकरने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रेमाची कबुली देत म्हटलं होतं की, “४ वर्षांचं रिलेशनशिप, ३ वर्षे लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप…या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहिली आहे.” या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.