Tumm Se Tumm Tak Hindi Serial Promo : मराठी मनोरंजनसृष्टीतील बरेच लोकप्रिय कलाकार सध्या हिंदी मालिकांमध्येही काम करत आहेत. ‘झी टीव्ही’ वाहिनीवर ७ जुलैला ‘तुम से तुम तक’ ही नवीन मालिका सुरू झाली. यामध्ये लोकप्रिय अभिनेता शरद केळकर आणि अभिनेत्री निहारिका चौकसे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका ‘झी मराठी’च्या गाजलेल्या ‘तुला पाहते रे’ची रिमेक आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर २०१८ मध्ये ‘तुला पाहते रे’ ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेला टेलिव्हिजनच्या इतिहासात रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळाला होता. सुबोध भावे, शिल्पा तुळसकर आणि गायत्री दातार यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका होत्या. आता याच मालिकेचं हिंदी व्हर्जन ‘तुम से तुम तक’ या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘तुम से तुम तक’ या रिमेकमध्ये शरद केळकर आणि निहारिका चौकसे यांच्यासह अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. यामध्ये निहारिकाच्या वडिलांची भूमिका लोकप्रिय मराठी अभिनेत्यांनी साकारली आहे. या अभिनेत्यांचं नाव आहे समीर पाटील.

समीर पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’च्या ‘शिवा’ मालिकेतून एक्झिट घेतली होती. शिवामध्ये ते ‘रामचंद्र देसाई उर्फ रामभाऊ’ ही भूमिका साकारत होते. समीर पाटील यांनी अचानक मालिका का सोडली याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. अखेर प्रेक्षकांना ‘तुम से तुम तक’ या हिंदी मालिकेत समीर पाटील यांची झलक पाहायला मिळतेय.

समीर पाटील ‘तुम से तुम तक’ या नव्या मालिकेत नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘शिवा’ मालिका सोडल्यावर समीर पाटील म्हणाले होते, “रामचंद्र देसाई उर्फ रामभाऊ… सर्व मित्र-मैत्रिणी आणि रसिक प्रेक्षकांना सांगताना आनंद आणि दु:ख एकत्र होतंय कारण, आता यापुढे ‘शिवा’ मालिकेत मी रामभाऊंची भूमिका साकारणार नाहीये. या भूमिकेला तुम्ही खूप प्रेम दिलं…आणि वेळोवेळी तुमचं या भूमिकेवर किती प्रेम आहे हे सुद्धा मला सांगितलंत यासाठी तुम्हा प्रेक्षकांचे खूप-खूप आभार. रामभाऊ या व्यक्तिरेखेला ‘झी मराठी’चा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे… याचं समाधान वेगळ आहेच. या प्रवासात खूप मित्र जोडले गेले त्यांचेही आभार. लवकरच नव्या प्रोजेक्टच्या निमित्ताने पुन्हा भेटू.”