Sankarshan Karhade Praises Mother : जगाच्या पाठीवर कुठेही जा… पण ‘आईच्या हातचा स्वयंपाक, आईने बनवलेल्या पदार्थांसारखी चव कुठेच येत नाही. अगदी साधेसुधे पदार्थ मग ते वरण-भात असो किंवा अगदी साधी खिचडी… प्रत्येकालाच आपल्या आईच्या हातचं जेवण प्रिय असतं आणि या जेवणाचं प्रत्येकालाच कौतुक असतं.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेसुद्धा आईच्या हातच्या जेवणाचं कौतुक केलं आहे. आईच्या जेवणाचचं कौतुक करताना अभिनेता म्हणाला मी व्हेंटिलेटरवर असलो तरी दहा मिनिटे उठून आईच्या हातचं जेवून पुन्हा व्हेंटिलेटरवर जाईन. नुकत्याच एका मुलाखतीत संकर्षणने त्याच्या आईवरील प्रेमाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. अभिनेता असण्याबरोबरच संकर्षण एक उत्तम लेखक आणि कवीसुद्धा आहे. आपल्या कवितांमधून त्याने अनेकदा आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशातच त्याने आईच्या हातच्या जेवणाचं कौतुक केलं आहे.

आरपारला दिलेल्या मुलाखतीत संकर्षण असं म्हणाला, “जर मला व्हेंटिलेटर लावला असेल आणि कोणी मला येऊन सांगितलं की, आईने गरम स्वयंपाक केलाय. तर मी उठून दहा मिनिटं जेवून पुन्हा व्हेंटिलेटरवर जाईन. आईच्या हातच्या जेवणाचं पावित्र्यच येणे नाही.”

यानंतर संकर्षण म्हणतो, “रोजच्या जेवणातली हिरव्या टोमॅटोची चटणी, गरम पापुद्रा निघालेली पोळी, गवारच्या शेंगांची भाजी, साधंच, कडीपत्त्याचीही फोडणी नसलेलं वरण आणि भात जर वाढला. मी रोज जेवताना रडतो. रोज म्हणजे रोजच… याबद्दल आता फोन लावून बाबा किंवा बायकोला विचारलं तर तेही हेच सांगतील.”

संकर्षण कऱ्हाडे इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे तो म्हणतो, “रोज जेवताना माझ्या डोळ्यांत पाणी येतं की, हे परब्रह्म आहे. आपण काही लोकांना Unsung Hero म्हणतो तसं ते आहे. स्वयंपाकाविषयी फार बोललं जात नाही; पण माझी आई दैवी आहे. प्रत्येकालाच आपली आई प्रिय असते म्हणा… मी माझ्या आईला म्हणतो हे म्हणतो सुद्धा की, तू जेव्हा जाशील तेव्हा स्वर्गातही देव म्हणतील की, तुम्ही इथल्या स्वयंपाकघरात काम करा आम्हाला खाऊ घाला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संकर्षण सध्या त्याच्या नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याचं ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक जोरदार सुरू आहे. शिवाय संकर्षणचं ‘नियम व अटी लागू’ हे नाटकही सुरू आहे. त्याचबरोबर संकर्षण स्पृहाबरोबर ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रमही घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.