मराठी मनोरंजनसृष्टीतील बहुआयामी कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. आपल्या अभिनयाने संकर्षणने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाबरोबर संकर्षणच्या कवितांचेही लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर संकर्षण मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत तो चाहत्यांच्या संपर्कात असतो. दरम्यान, संकर्षणच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
संकर्षणचे ‘नियम व अटी लागू’ नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. रंगभूमीवर हे नाटक विशेष गाजत आहे. या नाटकात संकर्षणबरोबर अभिनेत्री अमृता देशमुखचीही प्रमुख भूमिका आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर परदेशातही या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. लंडनमध्ये या नाटकाचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. या प्रयोगासाठी संपूर्ण टीम लंडनला जायला निघाली आहे. दरम्यान, संकर्षणने त्याच्या मुलांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
सर्वज्ञ व स्रग्वी या नावांची संकर्षणाला दोन जुळी मुलं आहेत. संकर्षण अनेकदा आपल्या मुलांबरोबर वेळ घालविताना दिसतो. सोशल मीडियावरही अनेकदा तो आपल्या मुलांचे फोटो शेअर करीत असतो. दरम्यान, आता मुलांना सोडून नाटकाच्या प्रयोगासाठी परदेशात जाताना संकर्षण भावूक झाल्याचे दिसून येत आहे. मुलांच्या आठवणीत संकर्षणने एक कविताही शेअर केली आहे.
संकर्षणने आपल्या इन्स्टाग्रामवर मुंबई विमानतळावरचा एक फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने लिहिले, “ ‘नियम व अटी लागू’च्या प्रयोगांसाठी लंडनला निघालो आहे. प्रवासाला निघताना मुलांच्या आठवणीत काही सुचलं. मी लहान असताना माझे बाबा बदलीच्या गावी जायचे, आठवडाभर तिकडेच असायचे आणि शनिवार, रविवार घरी यायचे. शनिवारी मी रात्री त्यांची खूप वाट पहायचो. सोमवारी पहाटे ते निघणार म्हणून मी रविवारपासूनच रडायचो. मी जरी बाबा झालो असलो तरी भावनेत धडपड करतोच आहे, आता मुलांना सोडून जाताना मी तसाच रडतो आहे. आता जे माझं होतंय, तेच बाबांचं व्हायचं का?, त्यांनाही माझ्यासारखंच लपूनछपून रडू यायचं का?”
त्याने पुढे लिहिले, “बाळ बाबाचा, बाबा बाळाचा, सहवास सतत मागतं; पण काय करणार कामासाठी लांब जावं लागतं. ऐकेल तो माझं नक्की. जर पाहत असेल देव, माझ्या बाळांना आणि माझ्या बाबांना आयुष्यभर सुखात ठेव” -संकर्षणची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.