Sankarshan Karhade Shares Ganpatipule Experience : कधीकधी आपल्या ध्यानीमनी नसताना आपण एखादी गोष्ट बोलून जातो आणि तीच गोष्ट नंतर कधीतरी सत्यात उतरते. असं म्हणतात की, एखादी गोष्ट घडून येण्यासाठी योग जुळून यावा लागतो. तो योग जुळून आला की, ठरलेली गोष्ट ही घडतेच. असाच काहीसा अनुभव संकर्षण कऱ्हाडेला आला होता.

संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या वडिलांना नकळतपणे ‘गणपती बाप्पा स्वतः मला दर्शनाला घेऊन जायला येईल’ असं म्हणाला होता. यावर त्याच्या बाबांनी त्याला सूचना वजा दमही भरला होता. पण पुढे जाऊन संकर्षणने नकळतपणे म्हटलेली गोष्ट सत्यात उतरली आणि हा अनोखा अनुभव स्वतः संकर्षणने सांगितला आहे.

आरपारला दिलेल्या मुलाखतीत संकर्षणने त्याच्या गणपतीपुळे मंदिरातील दर्शनाचा खास अनुभव शेअर केला आहे. याबद्दल अभिनेता असं म्हणाला, “एकदा मी बाबांना म्हणालो की, ‘रत्नागिरीला चाललोय, जमलं तर गणपतीपुळेला दर्शनासाठी जाईन’. तर बाबा मला म्हणाले, ‘मूर्खासारखं बोलून जाऊ नकोस. विचार करून बोलत जा. तू कधी रत्नागिरीला किंवा गणपतीपुळेला गेला आहेस का? तुला काही माहिती आहे का?’ त्यावर मी त्यांना ‘गणपती स्वतः मला घ्यायला येईल’ असं म्हटलं आणि गेलो.”

यानंतर संकर्षण सांगतो, “माझा रत्नागिरीला प्रयोग झाला. त्या प्रयोगानंतर एक जोडपं आणि त्यांचा गट्टू मुलगा बाजूला भेटण्यासाठी उभे होते. भेटून झाल्यावर त्यांनी मोदक दिला आणि म्हणाले, ‘तुमच्यासाठी आजचा नैवेद्याचा मोदकाचा प्रसाद आणला आहे.’ मग प्रसाद वगैरे खाल्ल्यानंतर त्यांनी माझ्याबरोबर फोटो काढला. फोटो काढल्यानंतर ते मला म्हणाले, ‘चला गणपतीपुळेला’. मग मी म्हणालो, ‘मी दर्शनाला जाणारच आहे’. त्यावर ते म्हणाले, ‘नाही… नाही… मी गाडी आणली आहे.’ मग मी त्यांना ‘तुम्ही कोण?’ असं विचारलं. त्यावर त्यांनी सांगितलं की, ‘मी गणपतीपुळे मंदिरातला पुजारी, उमेश घनवटकर.”

यानंतर संकर्षण म्हणतो, “त्यांनी नाव सांगताच मी असं म्हणलं की, ‘आपलं काही ठरलं नसताना तुम्ही मला चला का म्हणालात?’ त्यावर ते सांगतात ‘मला वाटलं तुम्हाला दर्शनाला यायचंय म्हणून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे संकर्षणने सांगितलं, “प्रयोग झाल्यावर मी तसाच मेकअप काढला, बॅग घेतली आणि त्यांच्या गाडीत बसून गेलो. तिकडे जाऊन मी त्यांना सांगितलं मला अभिषेक करायचा आहे आणि मला सोवळं नेसून करायचा आहे. त्यावर ते म्हणतात, ‘ठीक आहे! पहाटे पाच वाजता येतो’ आणि ते पाच वाजता सोवळं घेऊन आले. तिथून मला ते घेऊन गेले आणि माझ्या हातून अभिषेक झाला. म्हणजे मी सहज म्हणलं गणपती बाप्पा मला न्यायला येईल आणि ते झालंही… अजून काय पाहिजे…”