मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. नाटक, मालिका आणि टेलिव्हिजन शो अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांची मनं जिंकणारा संकर्षण सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो.
संकर्षण त्याच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे अनेक पोस्ट शेअर करत असतो. लेखक व कवी असल्यामुळे त्याच्या पोस्टचे कॅप्शन्स लक्ष वेधून घेतात. अंबाजोगाईसारख्या गावातून येत आपल्या कलेच्या जोरावर संकर्षणने आज मराठी इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संकर्षण हा नाटक, मालिका किंवा त्याच्या कवितांच्या कार्यक्रमांमध्ये कितीही रमला तरी त्याची गावची नाळ अजून तुटलेली नाही. अभिनेता अनेकदा त्याच्या बालपणीच्या आणि गावाकडच्या जुन्या आठवणी शेअर करत असतो. अशातच त्याने पुन्हा एकदा गावाबद्दलची एक खास आठवण शेअर केली आहे.
नाटकाच्या दौऱ्यानिमित्त संकर्षण सध्या विदर्भात आहे आणि या दौऱ्यातील मोकळ्या वेळेत त्याने आपल्या मूळ गावी जात अंबाजोगाई देवीचं दर्शन घेतलं. तसंच त्याने कऱ्हाडेंच्या घरच्या मारूती रायाचंही दर्शन घेतलं आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंसह एक आठवण शेअर केली आहे.
संकर्षण कऱ्हाडे इन्स्टाग्राम पोस्ट
या पोस्टमध्ये तो म्हणतो, “आमच्या मूळ गावी, ‘अंबाजोगाई’ला जात देवीचं आणि कऱ्हाडेंच्या घरच्या मारूती रायाचं दर्शन घेतलं. इथल्या गणपतीची गंमत सांगतो. लहानपणापासून आम्हाला सांगण्यात आलं होतं की, देवीच्या मंदिरातल्या गणपती बाप्पाला तुम्ही दाबून चिकटवलेला तांदूळ/गहू जर चिकटला, तर तुम्ही परीक्षेत पास होता. मी चिकटवलेला गहू नेहमी दोन सेकंद चिकटायचा आणि आपोआप गळून पडायचा. थोडक्यात मी पास होणार का नापास? हा सस्पेन्स गणपती बाप्पा राखून ठेवायचा.”
यानंतर संकर्षण म्हणतो, “आज बऱ्याच दिवसांनी वाटलं गहू चिकटवावा…, तर गणपती बाप्पा कुलूपाआड होते. माझ्या मनात विचार आला… कदाचित गणपतीनेच सांगितलं असेल की, नापास होणारी सगळी पोरं मला गहू चिकटवत आहेत. त्यापेक्षा मला लॉक करा. असो. पण, बाप्पा म्हटल्यावर काहीतरी मागावसं वाटतंच की हो… ते मागितलं आणि अपेक्षांचा एक गहू चिकटवून मी अंबाजोगाईहून निघालो.”
संकर्षणच्या या पोस्टला त्याच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी त्याच्या गावच्या आठवणीबद्दलही “खूप छान” आणि “तुझ्याबरोबर आम्हीही दर्शन घेतलं” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.