Marathi Actor Social Media Post : राज्यभरात सगळीकडे गणेशोत्सवानिमित्त आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरोघरी तसंच सार्वजनिक ठिकाणी लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. सामान्यांबरोबरच कलाकार मंडळींच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे.
हिंदीसह मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार आपल्या घरच्या बाप्पाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली असून या पोस्टमधून त्याने स्वतःचा एक अनुभवही सांगितला आहे.
श्रेयस राजे या अभिनेत्याने त्याच्या घरी गणपती बाप्पा आणताना अनोखा अनुभव आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. मराठी मालिका आणि सिनेमांमधून श्रेयसने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या अभिनयाने सर्वांचं मनोरंजन करणारा श्रेयस सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर श्रेयस त्याचे विचार, कविता किंवा काही प्रसंग, अनुभव शेअर करताना दिसतो. त्याचा या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो.
अशातच श्रेयसने शेअर केलेली पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये श्रेयस म्हणतो, “मी दैवावर विश्वास ठेवणारा नसलो; तरी गणेशोत्सव आवडीने साजरा करतो. कारण या सणाची उर्जा मन प्रफुल्लीत करत असते. असाच एक ताजा अनुभव…”
यापुढे तो अनुभव सांगतो की, “माझ्या घरच्या गणपतीची यावर्षीची मूर्ती आणताना एक गाडी बुक केली होती. गाडीच्या चालकाचं नाव ‘शोएब’ होतं. आम्ही जेव्हा जेव्हा ‘गणपती बाप्पा’ असं म्हणत होतो तेव्हा तेव्हा तो कौतुकाने आणि आनंदाने ‘मोरया’ म्हणत होता. आणि हो, त्या एकूण प्रवासातला या सणाबद्दलचा त्याच्या डोळ्यातला मी पाहिलेला आदर खऱ्याहून खरा होता.”
यानंतर अभिनेत्याने असं म्हटलंय, “सगळं छान आहे. हे जग तिरस्कार आणि भेदभावाने तुडुंब भरलेलं असलं तरी आपण आपला विवेकाचा विचार जागृत ठेवून ‘प्रेम’ पसरवण्याचाच प्रयत्न करत राहूया. नाही का?” या पोस्टखाली त्याने गणपती बाप्पा मोरया अशी कॅप्शनसुद्धा दिली आहे. श्रेयसच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.