मुंबईत आपलं हक्काचं घर असावं हे स्वप्न प्रत्येकाचं असतं. सामान्य लोकांप्रमाणे अनेक मराठी कलाकार सुद्धा अशी मोठी स्वप्न बघत या मायानगरीत आपलं नशीब आजमवण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकारांनी नवीन घरं घेत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. मात्र, आता नवीन घर घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत आणखी काही जणांची नावं जोडली गेली आहेत.
सध्या मुंबईत घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना आपलं हक्काचं घर देण्यासाठी म्हाडाची लॉटरी काढली जाते. अवघ्या काही घरांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज केले जातात. यामध्ये कलाकारांचा देखील समावेश असतो. या लॉटरीत नुकत्याच एका कलाकार कुटुंबाला हक्काचं घर लागलं आहे.
‘चार दिवस सासूचे’ फेम लोकप्रिय अभिनेते श्रीकांत देसाई यांना म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं आहे. त्यांनी नुकताच पत्नी रुपाली व लेक दिशासह नव्या घरात गृहप्रवेश केला. श्रीकांत यांची मुलगी दिशा ही लोकप्रिय कथक नृत्यांगना आहे. नव्या घरात प्रवेश केल्यावर दिशाने खास पोस्ट शेअर केली आहे.
दिशा देसाईची पोस्ट
एका Artist चं घर (Mhada)
A government declared artist at this stage of life is a beautiful blessing.मेहनत म्हणजे काय हे मी त्या दोघांकडून शिकले आहे. एक सच्चा कलाकार कधीच थांबत नाही. त्याला प्रत्येक गोष्टींमध्ये आपली कला दिसत असते. कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा कलाकार हा आपल्या कलेमुळे जिवंत राहतो. मला आठवतंय जेव्हा बाबा ICU मध्ये होते तेव्हा सुद्धा आईने तिचं कलेचं कार्य थांबवलं नाही. बाबांनी सुद्धा तिला ते थांबवू दिलं नाही.
तेव्हा मला त्यांच्या आयुष्यातील कलेची किंमत जाणवली. आपल्या कलेवरची निस्सीम भक्ती त्या दोघांचीही आहे आणि त्यामुळे मी जे काही आहे हे फक्त त्या दोघांमुळे… दोघांच्या पाठबळामुळे आणि त्यांच्या Constant प्रोत्साहनामुळे…
माझ्या स्वप्नांना मोठं करायला जेवढी मी मेहनत घेतेय तेवढेच ते ही घेतायत. एका कलाकार कुटुंबात माझा जन्म झाला याबद्दल मी कायम कृतज्ञ आहे आणि मी एक कलाकार असल्याचा मला खरोखर खूप अभिमान आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, सध्या देसाई कुटुंबावर संपूर्ण कलाविश्वातून नव्या घरासाठी कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.