Marathi Actor Share Nandurbar Temples Video : मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या कामाबद्दलची माहिती, तसंच वैयक्तिक आयुष्यातील काही आठवणी, प्रसंग वा अनुभवही शेअर करत असतात. तसंच आपल्या अनुभवांमधून ते चाहत्यांनासुद्धा त्या अनुभवांची पर्वणी घडवून आणतात. अशाच एका मराठी अभिनेत्याने त्याचा महाराष्ट्रातील नंदुरबारचा एक खास अनुभव शेअर केला आहे.

मराठी अभिनेता सुयश टिळकने चाहत्यांना नंदुरबारमधील देवस्थानांचं दर्शन घडवून आणलं आहे. तसंच खास व्हिडीओद्वारे त्याने देवदर्शनाचा अनोखा अनुभवही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “मला या शहराचं खूप आकर्षण आहे. त्याचं कारण इथली मंदिरं. पहिल्यांदा नंदुरबारला आलो होतो तेव्हा इथल्या एका रिक्षावाल्या राजुदादांनी मला नंदुरबारमधील वेगवेगळ्या मंदिरांबद्दल माहिती दिली आणि ती मंदिरं दाखवली. तेव्हापासून मी इथल्या मंदिरांच्या प्रेमातच पडलो.”

यानंतर सुयश म्हणतो, “इथे खूप सकारात्मक ऊर्जा देणारी महादेवांची मंदिरं बघायला मिळतात. काही मंदिरांच्या गाभाऱ्यात ध्यानासाठी पाच मिनिटं जरी बसलो तरी खूप समाधान मिळतं. गजानन महाराजांचं एक मंदिर आहे, ज्यात कधीही न आटणारा हौद आहे. विशेष म्हणजे इथली काही मंदिरं प्राचीन आहेत आणि या प्रत्येक मंदिरांना इतिहास आहे. महादेवांबरोबरच इतर देवीदेवतांची, शनीदेवांची इच्छा पूर्ण करणारी मंदिरे पाहायला मिळतात.”

तर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सुयश असं म्हणतो, “नंदूरबार या शहरात इतकी महादेवाची मंदिरं आहेत, हे काही वर्षांपूर्वी खरंच माहीत नव्हतं, तुम्ही देवावर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू; पण आयुष्यात काही अनुभव असे येतात, जेव्हा तुम्हाला एक शक्ती तारून नेत असते. आयुष्यातल्या कठीण प्रसंगात एक ताकद मिळते आणि मनोधैर्य वाढवण्यास मदत करते, ती शक्ती ती ताकद मला महादेवांमुळे मिळते असं मी मानतो. म्हणून कदाचित मी या शहरातील महादेवांच्या विशाल पिंडीवर महादेवासमोर नतमस्तक झालो.”

सुयश टिळक इन्स्टाग्राम व्हिडीओ

यापुढे तो लिहितो, “इथे वेगवेगळ्या ठिकाणी ही मंदिरं वसलेली आहेत. काही स्मशानाजवळ, काही जुन्या काळ्या पाषाणात… इथे काहीतरी आहे; जे नक्कीच अनुभव घेण्यासारखं आहे. फार प्रसिद्ध नसल्याने खूप गर्दी नसते आणि व्यावसायिक स्वरूप नसल्याने तसंच मोठी देवस्थाने प्रस्थापित नसल्याने, शांतता आणि भक्ती इतकंच अनुभवायला मिळतं. काही व्यक्ती, काही जागा किंवा काही अनुभव आपल्याला येतात, ते काहीतरी कारणास्तव… ते काहीतरी शिकवून जातात; काहीतरी दाखवून जातात. जसं मला रिक्षावाले राजूदादा काही वर्षांपूर्वी भेटले, त्यांनी या जागा दाखवल्या. मग तीन वर्षांनी परत आलो; तर योगायोग की, तेच रिक्षावाले दादा पुन्हा भेटले.”