Marathi Actor Social Media Post For Mahadevi Elephant : एका हत्तीणीसाठी माणसांच्या डोळ्यांत पाणी आल्याचं तुम्ही क्वचितच ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल… पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये हत्तीणीला निरोप देतानाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळत आहेत. ही हत्तीण म्हणजे माधुरी उर्फ महादेवी.
गेली ३५ वर्षे शिरोळमधील नांदणी गावात असणारी ही महादेवी ही हत्तीण सोमवारी रात्री गुजरातच्या ‘वनतारा’मध्ये रवाना झाली. यावेळी महादेवीला निरोप देताना अवघ्या गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रु जमा झाले होते. इतकंच नव्हे तर महादेवीच्या डोळ्यांत सुद्धा आसवं जमा झाल्याचे अनेक व्हिडीओ पहायला मिळाले.
गुजरातच्या वनतारामध्ये महादेवी हत्तीण सुखरुप पोहोचल्याचे समोर आले असले तरी, ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे आता महादेवीला पुन्हा नांदणीत आणण्याची मागणी सर्वच स्तरातून जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावर याप्रकरणी अनेकजण त्यांची मतं व्यक्त करत आहेत. मराठी इंडस्ट्रीमधील कलाकारसुद्धा महादेवीसाठी पुढे सरसावले आहेत.
‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार, अभिनेत्री आरती सोळंकी यांनी महादेवीसाठी पोस्ट शेअर केली आहे. अशातच आता आणखी एका मराठी अभिनेत्याने याप्रकरणी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे स्वप्नील राजशेखर यांनी महादेवी हत्तीणीबद्दलची सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये ते असं म्हणतात, “पेटा ही वन्यजीवांसाठी अनेक ठिकाणी उपकारक कार्य करत असेल. परंतु ‘माधुरी’ हत्तीणीबाबत मात्र थोडा आतताईपणा झालाय… इतकी वर्षे त्या मुक्या जिवाची आणि ग्रामस्थांची एकमेकांत मानसिक गुंतवणूक इतकी गहरी झालीय की, हा दुरावा त्यांना मानवणारा नाही… शिरोळकर आक्रमक झाले आहेतच; पण देव न करो तिकडे माधुरी आक्रमक झाली किंवा विरहाने तिच्या प्रकृतीवर बेतलं तर ‘पेटा’च्या मूळ उद्देशालाच गालबोट लागेल.”
यानंतर ते असं म्हणतात, “अनेकदा नियम आणि कल्याणकारी वाटणारे उपाय सुध्दा परिस्थितीनुरुप बदलले जायला हवेत. प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा यांचं मोल जाणुन मग निर्णय घ्यायला हवेत. माधूरी परत येत नाही तोवर ग्रामस्थ सुखाचा श्वास घेणार नाहीत आणि कदाचीत ती गजस्वामिनीसुध्दा.” दरम्यान, स्वप्नील यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.