Swapnil Raajshekhar : मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणून स्वप्नील राजशेखर यांना ओळखलं जातं. त्यांनी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अधिपतीचे वडील म्हणजेच चारुहासचं पात्र साकारलं होतं. त्यांची ही भूमिका घराघरांत प्रचंड लोकप्रिय झाली होती.
अभिनेते स्वप्नील राजशेखर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा या माध्यमातून ते विविध सामाजिक विषयांवर भाष्य करतात. क्रिकेट सामने असो, रस्त्यावरील खड्डे असो किंवा कोल्हापुरी चपलेचा वाद अशा विविध विषयांवरच्या त्यांच्या भन्नाट पोस्ट नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेतात.
स्वप्नील राजशेखर नुकतेच रजनीकांतची प्रमुख भूमिका असलेला ‘कुली’ सिनेमा पाहून आले. हा सिनेमा त्यांना कसा वाटला याबद्दल अभिनेत्यांनी सोशल मीडियावर मिश्किल पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
रजनीकांत यांचा कुली सिनेमा १४ ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग करत ६५ कोटींची कमाई केली होती. मात्र, या सिनेमाबद्दल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
‘कुली’ पाहिल्यावर स्वप्नील राजशेखर म्हणतात, “कुली’ बघताना वेळ बरा गेला…कथा काय होती यावर प्रेक्षकांमध्ये संभ्रम होता…’ओपन एंड’ असतो, तशी ओपन कथा आहे. ज्याला जी वाटेल ती…”
दरम्यान, एका नेटकऱ्याने स्वप्नील राजशेखर यांची मिश्किल पोस्ट वाचून, “जाऊ की नको बघायला” असा प्रश्न कमेंटमध्ये विचारला आहे. यावर अभिनेत्यांनी “रजनीच्या एन्ट्रीला शिट्या मारायला जायला लागतंय की….मी खच्चून शिट्या हाणल्यात..” असं उत्तर दिलं आहे.
तर, दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “बरोबर आहे तुमचं आताच बघून बाहेर पडलोय.. गाडी इथंच पार्किंग मध्ये सोडून चालत घरी जाणार आहे मी..” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका युजरने, “एखादी कलाकृती थोडीफार गंडली की प्रेक्षकांवर सोडून द्यायचं…घ्या..ज्याला जसे हवे तसे..” असं कमेंट्समध्य म्हटलं आहे.