Bigg Boss 19 Show : टेलिव्हिजनवरील बहुचर्चित शो म्हणजे ‘बिग बॉस.’ मराठीसह हिंदी ‘बिग बॉस’ही खूपच लोकप्रिय आहे. या शोचे अनेक सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांनीसुद्धा भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशातच आता लवकरच हिंदी ‘बिग बॉस’चा १९वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून हिंदी ‘बिग बॉस’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू होत्या. त्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस’च्या १९व्या पर्वाचा पहिला प्रोमो समोर आला. तेव्हापासून या शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक स्पर्धकांच्या नावांच्या चर्चा होताना दिसत आहेत.

‘बिग बॉस’च्या १९ व्या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या काही स्पर्धकांची संभाव्य नावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यात मराठी अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या नावाचीसुद्धा चर्चा होती. याबद्दल त्यांनी आता स्वत: खुलासा केला आहे. ‘बिग बॉस १९’साठी विचारणा झाली असल्याची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. या पोस्टसह त्यांनी बिग बॉसमध्ये जाणार की नाही, याबद्दल स्पष्टीकरणही दिलं आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यांनी यासंबंधित पोस्ट शेअर केली आहे आहे. या पोस्टमध्ये उपेंद्र लिमये असं म्हणतात, “‘बिग बॉस’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा मी भाग आहे का? याबद्दल मला अनेकांकडून विचारणा झाली आहे. तर यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, मी या शोचा भाग नाही. पण तुमच्या पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद – उपेंद्र लिमये”

उपेंद्र लिमये इन्स्टाग्राम स्टोरी
उपेंद्र लिमये इन्स्टाग्राम स्टोरी

‘बिग बॉस १९’मध्ये सहभागी होणऱ्या काही संभाव्य स्पर्धकांची यादी आली आहे. ज्यात गुरुचरण सिंग (‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील सोढी), शैलेश लोढा (‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे लेखक), अपूर्वा मुखिजा, रफ्तार (गायक आणि रॅपर), मीरा देवस्थळे (मराठी व हिंदी मालिकांतील अभिनेत्री), धनश्री वर्मा (कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया स्टार) अशा काही नावांच्या चर्चा आहेत.

दरम्यान, ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन येत्या २४ ऑगस्टपासून रात्री १०:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस १९’ हा शो प्रेक्षकांना ‘कलर्स टीव्ही’ आणि ‘जिओ हॉटस्टार’वर पाहायला मिळेल. यंदा ‘बिग बॉस’ची थीम ही राजनीतीवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.