Marathi Actress’s Post On Mahadevi Elephant : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका हत्तीणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक गावकरी या हत्तीणीला निरोप देत आहेत आणि हा निरोप देताना अनेक गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. इतकंच नव्हे तर त्या हत्तीणीलासुद्धा अश्रू अनावर झाले.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधील ही हत्तीण आहे, कोल्हापूरच्या शिरोळमधील नांदणी गावातील महादेवी हत्तीण. गेली ३५ वर्षे शिरोळमधील नांदणी गावात असणारी ही महादेवी हत्तीण गुजरातकडे रवाना झाली. यावेळी तिची पाठवणी करताना गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले.
कोल्हापुरच्या या महादेवी हत्तीणीची गुजरातच्या ‘वनतारा’मध्ये पाठवणी करण्यात आली आहे. महादेवी हत्तीणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्यात आल्यानंतर अनेक जण तिला परत आणण्याची मागणी करत आहेत. मराठी मनोरंजन सृष्टीतूनही यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार यांनी याबद्दल व्हिडीओ शेअर करत ‘आमची महादेवी हत्तीण आम्हाला परत द्या’ अशी भावनिक साद घातली होती. यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने यासंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे.
मराठी अभिनेत्री आरती सोळंकीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती असं म्हणते, “इतर वेळी उद्योग-धंदे महाराष्ट्रातून गुजरातला जातात, तेव्हा त्यावर नको तितकं राजकारण होतं. आवाज उठवला जातो. मग जेव्हा आपल्या माधुरीला नेलं; आता कुठे गेले ते सगळे? बहुतेक ती (माधुरी हत्तीण) मतदान करत नसेल किंवा नेमकी ती कुठल्या पक्षाची आहे हे कळत नसल्यामुळे कोणीही बोलत नसावं.”

दरम्यान, आरती सोळंकी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिच्या कामानिमित्तची माहिती तसंच स्वत:चे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. तसंच ती अनेकदा राजकीय आणि सामाजिक परिस्थितींवरही मोकळेपणाने तिचं मत व्यक्त करताना दिसते. अशातच तिने महादेवी हत्तीणीबद्दलची तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.