सिगारेटच्या पाकिटावर “सिगारेट ओढणं आरोग्यासाठी घातक आहे”, असा इशारा असतो. ग्राहकांनी त्याचा वापर करण्यापूर्वी ते चित्र पाहून सावध व्हावे हा त्यामागील उद्देश असतो. तसेच आता समोसे, जिलेबीबाबत आरोग्यविषयक इशारा देणारे फलकही लावण्यात येणार आहेत. भारतातील लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
भारत सरकारचे आरोग्य मंत्रालय आता समोसा, जिलेबी यांसारख्या अन्नपदार्थांबद्दल धोक्याचा इशारा देण्याचे फलक लावणार आहे. त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये ‘तेल आणि साखरेचे इशारा फलक’ लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बोर्ड केंद्रीय संस्थेच्या कॅन्टीन आणि सार्वजनिक ठिकाणी लावले जातील. यावर समोसा, जिलेबी यांसारख्या स्नॅक्समध्ये किती तेल आणि साखर असते याची माहिती दिली जाईल.
या निर्णयावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच मराठी अभिनेत्रीनेही समोसा, जिलेबी यांसारख्या अन्नपदार्थांबद्दल इशारा फलक लावण्यावर सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनेत्री आरती सोळंकी हिने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आणि त्या पोस्टद्वारे तिने वडापाव, समोसासारख्या पदार्थांबाबत सूचना देतानाच पिझ्झा-बर्गर या पदार्थांच्या बाबतीत सूचना देण्याची मागणी केली आहे.
आरती सोळंकी इन्स्टाग्राम पोस्ट
आरती सोळंकी तिच्या या पोस्टमध्ये असं म्हणते, “जिलेबी, समोसे यांमुळे वजन वाढतं? मग पिझ्झा, बर्गर, मोमो, पास्ता यांमुळे वजन वाढत नाही का? हिंमत असेल, तर सरकारनं चीजचे जेवढे पदार्थ आहेत, त्यावर बंदी आणावी. वडापाव, समोसे, जिलेबी हे पदार्थ आमचे आवडीचे पदार्थ आहेत. डॉमिनोज, पिझ्झा हट, मॅकडॉनल्ड आणि डेअरी पदार्थांवर बंदी आणा. कष्ट करून वडापाव-समोसे विकणाऱ्या गरिबांचे स्टॉल बंद पाडू नका.”
दरम्यान, आरती सोळंकी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती अनेकदा काही विषयांवर परखडपणे मतं व्यक्त करत असते. आरतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं मालिका आणि रिअॅलिटी शोमधून सहभाग घेतला आहे. बिग बॉस मराठीमध्येही ती सहभागी झाली होती. तिने ‘४ इडियट’, ‘येड्यांची जत्रा’, ‘वाजलंच पाहिजे’ व ‘लूज कंट्रोल’ अशा काही चित्रपटांतही काम केलं आहे.