Amruta Deshmukh Talk About TV industry : टीव्ही इंडस्ट्री हे मनोरंजनाचं एक प्रभावी माध्यम असलं तरी या क्षेत्राची गणितं फार वेगळी असतात. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सगळा खेळ हा टीआरपीचा असतो. या टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून अनेक प्रयत्न केले जातात.
तसंच अनेकदा टीव्ही मालिकांमधील भूमिकांची निवड करताना काही लोकप्रिय आणि गाजलेल्या कलाकारांना संधी दिली जाते. कारण या चेहऱ्यांची तितकी लोकप्रियता आणि प्रसिद्धी असते. त्यामुळे मालिका विश्वातील कास्टिंग हा एक मोठा मुद्दा आहे, याचबद्दल एका मराठी अभिनेत्रीने तिची प्रतिक्रिया दिली आहे, ही अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख.
लोकप्रिय मालिका, तसंच नाटक आणि काही सिनेमांमधून अमृताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. याशिवाय ती युट्यूबवरही तितकीच सक्रीय असते. तिचं स्वत:चं युट्यूब चॅनेलसुद्धा आहे. युट्यूब चॅनेलवर तिने एक व्हिडीओ शेअर करत टीव्ही इंडस्ट्रीची दुसरी बाजू सांगितली आहे.
या व्हिडीओमधून तिने अनेकदा चॅनेलच्या लोकांना एखाद्या प्रोजेक्टसाठी मुख्य भूमिकांत काम केलेलेच कलाकार हवे असतात असं म्हटलंय. या व्हिडीओमध्ये अमृता म्हणते, “कलाकाराच्या आयुष्यात ऑडिशन देणं हा प्रकार दात घासण्याइतका रोजचा असतो. पण माझ्या आयुष्यात तो वेदनादायी झालाय. कारण माझ्या आयुष्यात ऑडिशन प्रासंगिक आणि वेदनादायीच आहे. याचे तिनं चार प्रकार सांगितले आहेत.”
यापुढे ती पहिला प्रकार सांगत असं म्हणते, “जसं मलायका अरोरा जीमला जाताना तिच्या पाठीमागे पापाराझी धावते. तसंच ज्या क्षणी मला कळतं की, एखाद्या चॅनेलवर नवीन प्रोजेक्ट येणार आहे. त्यानंतर लगेचच असं कळतं की, या प्रोजेक्टसाठी अगोदरच कास्टिंग झालेलं आहे. कुणाचं? तर माजी लीडचं (मुख्य)… म्हणजे एकतर दुसऱ्या चॅनेलवर त्यांनी मुख्य भूमिकेत काम केलंल असेल किंवा त्याच चॅनेलवर ज्यांनी मुख्य भूमिकांमध्ये काम केलंय…”
यापुढे अमृता सांगते, “या लोकांना मासिक भिशी तत्त्वावर चॅनेलने थांबवून ठेवलेलं असतं. कारण त्यांना तेच हवेत. या इच्छुक कलाकारांच्या महासागरात चॅनेलला इतर काही रत्न मिळालेली असतात, ती त्यांना जपून ठेवायची असतात. कारण या रत्नांशिवाय टीव्ही इंडस्ट्रीचा, डेलीसोपचा रत्नहाऱ होऊच शकत नाही. नाहीतर तो हार विकलाच जाणार नाही.”