‘झी मराठी’ वाहिनीवर २०२१ मध्ये ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत अभिनेत्री अमृता पवार आणि हार्दिक जोशी म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका ‘राणादा’ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेला प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री अमृता पवार वैयक्तिक आयुष्यात जुलै २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकली. आता अमृताने सोशल मीडियावर चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
अमृताने यावर्षी मे महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला. नुकतंच तिच्या लाडक्या लेकाचं बारसं थाटामाटात पार पडलं आहे. याचा व्हिडीओ अमृताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्रीने यावेळी लाल अन् सोनेरी शेड असलेली सुंदर अशी साडी नेसली होती. यावर छानसे दागिने, केसात गजरा, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा या लूकमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत होती. या व्हिडीओला तिने ‘नामकरण सोहळा’ असं कॅप्शन दिलं आहे.
अमृता पवारने तिच्या लाडक्या लेकाचं नाव ठेवलंय निवान. ‘निवान’ म्हणजे पवित्र व शुद्ध असा अर्थही अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये सांगितला आहे. या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूपच छान नाव ठेवलंय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी अमृताला दिल्या आहेत.
अमृता पवारने २०२२ मध्ये नील पाटीलशी लग्न केलं. तिचा पती सिनेविश्वापासून दूर असून व्यवसायाने इंजिनीअर आहे. अमृता नेहमीच तिच्या पतीबरोबर खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता अमृता तिला लेक निवानची पहिली झलक चाहत्यांना केव्हा दाखवणार याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
अमृताने आतापर्यंत ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेसह ‘पाहिले मी तुला’, ‘सीनिअर सिटीजन’, ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ अशा मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘दुहेरी’ मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती. टेलिव्हिजन इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अमृता एका सीएकडे लेखापाल म्हणून काम करत होती.
