मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून जुई घराघरांत पोहोचली. या मालिकेत जुई ‘सायली’ ही भूमिका साकारत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर जुईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाबरोबरच जुई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिच्या लग्नाची चर्चाही अनेकदा रंगताना दिसते. दरम्यान, एका मुलाखतीत जुईने तिच्या लग्नाबाबत भाष्य केले आहे.
नुकतेच जुईने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. लग्नाबाबत बोलताना जुई म्हणाली, “मला अनेकदा लोक विचारतात, तुमचं लग्न झालं नाही तर पुढच्या गोष्टी कशा होणार? मला मान्य आहे, माझ्या लग्नाला उशीर झाला आहे. माझं लग्न कधी होणार मुलं-बाळं कधी होणार, हे सगळे प्रश्न माझ्याही मनात येतात. मग त्यावेळेस मी माझ्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टी कोणत्या आहेत, त्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करते.”
जुई पुढे म्हणाली, “माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्या त्याच्या मर्जीनुसारच घडल्या आहेत. त्यामुळे माझं लग्न व माझं सगळं पुढचं आयुष्य हेसुद्धा त्याच्या मर्जीनुसारच घडणार आहे. मला अनेक जण म्हणतात, आता तू पस्तीशी ओलांडली; कधी करणार लग्न? तेव्हा मी स्वत:ला समजावते. या सगळ्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे. जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्याबरोबर असतं, तेव्हा तुम्हाला या गोष्टींचा त्रास होत नाही.”
हेही वाचा- ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याचं उद्योग क्षेत्रात पदार्पण, फलटणमध्ये सुरू केला स्वतःचा ‘हा’ व्यवसाय
जुईच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने साकारलेली कल्याणी ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. तसेच ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुझविन सख्या रे’ या मालिकांमधील जुईची भूमिका चांगलीच गाजली. मालिकांव्यतिरिक्त जुईने बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला होता. मध्यंतरीच्या काळात आजारपणामुळे जुईने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. मात्र, आता पुन्हा तिने छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केले आहे.