दिग्गज अभिनेते अशोक सराफ ‘नवरा माझा नवसाचा २'(Navra Maza Navsacha) या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता या चित्रपटाच्या यशानंतर ते कलर्स मराठी वाहिनीवर ‘अशोक मा. मा.’ या मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या या मालिकेची चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत होते. अभिनेत्री नेहा शितोळेदेखील बऱ्याच काळानंतर टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अशोक मा. मा. या मालिकेत ती फुलराणी ही भूमिका निभावताना दिसत आहे. आता एका मुलाखतीदरम्यान, अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव तिने सांगितला आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री नेहा शितोळेने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. अभिनेत्रीने म्हटले, “ज्या पद्धतीचं फुलराणी व अशोक मा. मा. यांचं नातं आहे, तसंच काहीसं नातं माझं आणि अशोक सराफ अशा आम्हा दोघांमध्ये तयार होऊ लागलं आहे; म्हणजे त्यातील भांडणाचा भाग सोडता. पण, मी जेव्हा एखाद्या सीनमध्ये वरचा सूर लावते तेव्हा मला काळजी वाटते की, त्यांनासुद्धा वरचा सूर लावायला लागणार आहे. आणि भीती वाटते की, आपण त्यांची खूप शक्ती घालवतोय. माझ्यामागे पळण्यामध्ये किंवा सीन करताना त्यांची खूप धावपळ होते. त्यामुळे काही काही वेळेला घरी जाताना वाटतं की, माझ्यामुळे त्यांना खूप एनर्जी लावायला लागतेय आणि त्यामुळे माणूस दमतोय. पण, त्यांना स्वत:लाच ते आवडतं आणि त्यामुळे काम करताना मजा येते.”

अशोक मा.मा. अशोक सराफ, नेहा शितोळे यांच्याबरोबरच या मालिकेत अभिनेत्री रसिका वाखारकर महत्त्वाच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे. ती ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

हेही वाचा: अभिषेक बच्चनचा ‘आय वॉन्ट टू टॉक’ बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला; करिअरमधील सर्वाधिक कमी कलेक्शनची नोंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अशोक सराफ ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातून नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचे पाहायला मिळाले. आता अशोक मा. मा. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. त्याबरोबरच अभिनेत्री नेहा शितोळे बिग बॉस मराठीच्या दुसर्‍या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिने ‘टॉप २‘पर्यंत मजल मारली होती. या पर्वाचा विजेता शिव ठाकरे ठरला होता.