Rutuja Bagwe on Investment: अभिनेत्री ऋतुजा बागवेने ‘नांदा सौख्यभरे, ‘चंद्र आहे साक्षीला’ ‘माटी से बंधी डोर’, अशा विविध मालिकांमधून, ‘अंधारमाया’सारख्या वेब सीरिज तसेच नाटक यामधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

“मला खूप खर्च करायला…”

आता अभिनेत्रीने नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने कमी वयात स्वत:चं घर घेण्याबद्दल वक्तव्य केले आहे. अभिनेत्रीला विचारले की स्वत:च्या पैशाने खूप तरुण वयात घर घेतलंस आणि तू कुठेतरी म्हणाली होतीस की तू पूर्वीपासून पैसे साठवायचीस, तर याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. यावर अभिनेत्री म्हणाली, “माझा मूळ स्वभाव असा आहे की मला खूप खर्च करायला आवडत नाही. अनाठायी खर्च करू नये, असं मला आईने आधीपासून सांगितलेलं आहे.”

“असं म्हणतात की, कमाईतील ४० टक्के बचत करावी आणि ६० टक्के वापरावे. तर मी याउलट करते. मी माझ्या कमाईतील ४० टक्के वापरते आणि ६० टक्के बचत करते.”

“जेव्हा मी एकांकिका स्पर्धा जिंकायला लागले, तर त्यातीलसुद्धा काही पैसे मी काढून ठेवायचे, कारण आमच्या घरी ही सवय लावलेली होती. एकांकिका स्पर्धा जिंकली तर त्यातून एकांकिकेसाठी लागणाऱ्या गोष्टी घ्यायच्या. पुढच्या एकांकिकेची एन्ट्री फी भरायची. तर ती सगळी गणितं आधीपासूनच सुरू झाली होती. मग जेव्हा जेव्हा, जसे जसे पैसे मिळायचे, तेव्हा मी गुंतवणूक करत गेले.”

पुढे अभिनेत्रीने असेही सांगितले की, आईचं नेहमीच हे म्हणणं असायचं की स्वावलंबी असलं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या इतकं स्वावलंबी असावं की त्यासाठी लग्न करायची गरज नाही. या सगळ्या विचारातून घर घेतलं. आता काही दिवसांपूर्वीच ‘फुडचं पाऊल’ नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे.

दरम्यान, आता आगामी काळात अभिनेत्री कोणकोणत्या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.