झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. दत्ता हे पात्र साकारणारा अभिनेता सुहास शिरसाटही या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सुहासने पत्नीसह पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सुहासची पत्नी स्नेहा माजगावकरही उत्तम अभिनेत्री आहे. ९ जूनला सुहास व स्नेहाच्या लग्नाचा वाढदिवस होता. या दोघांच्या लग्नाला दहा वर्ष झाली आहेत. याचनिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी तसेच मित्र परिवाराने त्यांच्यासाठी खास सरप्राइजचं आयोजन केलं होतं. तसेच १० जूनला सुहासचा वाढदिवस होता. यावेळी सुहास व त्याच्या पत्नीने अगदी धमाल-मस्ती केली.
आणखी वाचा – “देखणा पैलवान माझ्या आयुष्यात होता पण…” सई ताम्हणकरने अफेअरबाबत केला होता खुलासा, म्हणालेली, “आम्ही अजूनही…”
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुहास व स्नेहाने पुन्हा लग्न केलं. स्नेहा पोस्ट शेअर करत म्हणाली, “लग्नाच्या दहा वर्षांनंतर त्याच दिवशी आम्हाला गोड माणसांकडून एक गोड सरप्राइज मिळालं. त्यांनी आमचं पुन्हा लग्न लावून दिलं. ९ व १० जून हे दोन दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ९ जूनला लग्नाचा वाढदिवस. तर १० जूनला सुहासचा वाढदिवस”.
“हे दोन्ही दिवस या माणसांमुळे अगदी आनंदाचे गेले. सगळ्यांना खूप सारं प्रेम”. या व्हिडीओमध्ये सुहास व स्नेहाने मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहेत. यावेळी अगदी साधे कपडे दोघांनी परिधान केले होते. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा लाखमोलाचा होता. सुहास व स्नेहाच्या या व्हिडीओचं नेटकरीही कौतुक करत आहेत.