‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन घराघरांत लोकप्रिय झाली. मुग्धाने आपल्या गोड आवाजाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. प्रेक्षकांची ही लाडकी गायिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील विविध अपडेट्स ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. मुग्धाने नुकतीच इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मुग्धाने तिच्या वडिलांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. मुग्धा लिहिते, “माझे हिरो, कायम माझ्या पाठीशी असणारे, माझी शक्ती, माझे आदर्श, प्रत्येक गोष्टीत मला साथ देणारे माझे बाबा…तुम्हाला ६० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”
“Unfortunately आपण बाबांबद्दल फार कमी वेळा व्यक्त होतो.. आज त्यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने थोडं लिहिते…खूप लहानपणापासून बाबांनी मला माझ्या नकळतपणे चांगली गाणी ऐकवली.. एक स्टँडर्ड सेट करून दिलं.. पंडित रामभाऊ मराठे, पंडित गजाननबुवा जोशी, पंडित अभिषेकी बुवा, लता दीदी, आशा बाई अशा अनेक दिग्गजांची गाणी बाबा घरी सतत लावून ठेवायचे. त्यानंतर सारेगमपमध्ये त्यांचं ऑफिस सांभाळून माझी गाणी बसवून घेण्यापासून ते माझे केस सेट करुन देण्यापर्यंत सगळं केलंय बाबांनी… माझं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू झाल्यावर तिलवाडा झुमरा तालांचे संस्कार माझ्यावर व्हावे म्हणून बाबा ताल मशिनवर ते ठेके मला घरी नुसते ऐकवायचे… १० वी नंतर बाबा ज्या कॉलेजात शिकले त्याच माटुंग्याच्या रुपारेल कॉलेजमध्ये मी शिकले.. आणि ‘मुंबईचं जग’ बाबांनी दाखवलं.. बाबा कायम म्हणतात.. “आपल्याकडे कला थोडी कमी असली तरी चालेल, पण ‘माणूस’ म्हणून आपण परिपूर्णच असायला हवं” बाबांशिवाय हे सगळं माझ्यासाठी अजून कुणी केलं असतं? तुम्ही माझ्या आयुष्यात आहात हे माझं भाग्यच आहे…लव्ह यू बाबा!” असं म्हणत मुग्धाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, मुग्धाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच मुग्धाच्या वडिलांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.
