Marathi Singer Post For Tejashree Pradhan : झी मराठी वाहिनीवर अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिका ११ ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेची सर्वत्र चर्चा सुरू होती. मालिकेची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांनी मालिकेविषयी उत्सुकता व्यक्त केली होती.

झी मराठीवर सुरू झालेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेमध्ये तेजश्रीने स्वानंदी सरपोतदार ही भूमिका साकारली असून, सुबोध समर राजवाडे हे पात्र साकारत आहे. या मालिकेनिमित्त तेजश्री पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहे. यामुळे तिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. मालिकेच्या पहिल्या भागाबद्दलही प्रेक्षकांनी आनंदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

अशातच लोकप्रिय मराठी गायिकेनेसुद्धा तेजश्री प्रधानसाठी पोस्ट शेअर केली आहे. गायिका सावनी रवींद्र हिने सोशल मीडियावर तेजश्रीसाठी पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेसाठी सावनीने पार्श्वगायनही केलं आहे. याआधी सावनीने तेजश्रीच्या होणार सून मी ह्या घरची मालिकेत गाणं गायलं होतं. त्यानंतर आता पुन्हा सावनीने तेजश्रीच्या मालिकेचं शीर्षक गीत गायलं आहे.

सावनीने तेजश्रीबरोबरचा फोटो शेअर करत असं म्हटलंय, “१२ वर्षांपूर्वी तेजूचा आवाज बनून घराघरात पोहोचले… ‘होणार सुन मी ह्या घरची” या मालिकेने आणि त्यातल्या गाण्यांनी इतिहास घडवला… त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी तेजूसाठी पुन्हा गाण्याचा योग आला. निमित्त होतं, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नवीन मालिकेच्या शीर्षकगीताचं. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या निमित्ताने इतिहासाची पुनरावृत्ती होवो हीच मोरया चरणी प्रार्थना. प्रिय तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे दादा या मालिकेसाठी तुम्हाला खूप प्रेम आणि खूप शुभेच्छा.”

सावनी रविंद्र इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे सावनीने झी मराठी वाहिनी, संगीतकार ए.व्ही. प्रफुल्लचंद्र आणि गीतकार वैभव जोशी यांना धन्यवाद म्हटलं आहे. दरम्यान, या गाण्यासाठी सावनीला ‘बिग बॉस मराठी ५’ फेम अभिजीत सावंतचीसुद्धा साथ लाभली आहे. याबद्दल तिने अभिजीतबरोबर गाणं गाण्याची मज्जा काही औरच अशा शब्दांत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.