महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी त्रिभाषा सूत्रानुसार पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य केली होती. मात्र सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध झाला होता. हिंदी भाषेच्या सक्तीला झालेल्या विरोधामुळे राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतलं. यावेळी राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य नसणार अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. दरम्यान, सरकारच्या हिंदी भाषा अनिवार्यच्या निर्णयावर अनेक कलाकार मंडळींनीही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यावर आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने तिचं मत व्यक्त केलं आहे.

हिंदी भाषेबद्दल अभिनेत्री मेघा धाडेने भाष्य केलं आहे. मेघाने नुकताच अमृता फिल्म्स या युट्यूब चॅनेलबरोबर संवाद साधला. यावेळी सरकारच्या हिंदी भाषेच्या निर्णयावर मत व्यक्त करताना मेघाने असं म्हटलं की, “महाराष्ट्रातील मराठी शाळांमध्ये मराठी हे शिकवलंच पाहिजे. कितीतरी शाळांमध्ये फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषा शिकवल्या जातात. सगळ्यात आधी तुम्हाला तुमची मातृभाषा आलीच पाहिजे. ज्या त्या राज्याची, प्रांताची मातृभाषा ही तिथल्या लोकांना तर आलीच पाहिजे. एखाद्या शहरात जर तुम्ही काम किंवा व्यवसायानिमित्त राहणार भरपूर काळ राहणार असाल तर त्यांनी तिथली भाषा शिकली पाहिजे.”

यापुढे मेघा असं म्हणाली की, “त्या प्रांतात तुमच्या चार-चार पिढ्या जात असतील आणि फिल्म इंडस्ट्रीत करिअर किंवा मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्यांची जर दहा-दहा वर्षे इथे जात असतील तर त्यांनी तिथली भाषा शिकलीच पाहिजे. निदान प्रयत्न तरी केला पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी शिकायलाच पाहिजे. शाळांमधूनही ती शिकवली गेली पाहिजे. आणि हिंदीही शिकवाच, पण या सगळ्या भाषांची जी जननी आहे ती म्हणजे संस्कृत. ही भाषाही सगळ्यांना शिकवली पाहिजे.”

पुढे मेघाने असं म्हटलं की, “किती वेगवेगळ्या भाषा शिकायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ज्या राज्यात तुम्ही राहता, जिथे तुमचा जन्म झाला आहे आणि जिथे तुम्ही लहानाचे मोठे झाला आहात. तिथली भाषा आलीच पाहिजे. त्यात आपण भारतात राहतो तर हिंदी भाषासुद्धा आलीच पाहिजे. मला वाटतं इंग्रजी भाषासुद्धा शिका. तुम्हाला एका राज्यापुरतं किंवा शहरापुरतं सीमित राहायचं नाही. जगभर फिरायचं आहे आणि प्रवास करायचा आहे. तुमचे विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर यासाठी तुम्ही इंग्रजी भाषासुद्धा शिकली पाहिजे. कोणत्याही गोष्टीसाठी भाषा अडथळा होऊच नये.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्याच पर्वाची विजेती मेघा धाडे झाली होती. तिने आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. पण तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती ‘बिग बॉस मराठी’मुळे. मेघा कायम तिच्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. सोशल मीडियाद्वारे ती तिचे अनेक मतं चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तसंच विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवरही ती तिची मतं व्यक्त करते. सध्या मेघा ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.