Megha Dhade Talk’s About Daughter Says She Wanted A Father : अभिनेत्री मेघा धाडेनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ती मालिकेत काम करत असून, त्यामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मेघाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तिला एक मुलगी आहे, जिचा ती एकटीनंच सांभाळ करीत होती. परंतु, यादरम्यान तिच्या मुलीला वडिलांची उणीव जाणवायची. याबाबत अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
मेघा धाडेनं तिची मुलगी साक्षीचा काही काळ एकटीनं सांभाळ केला. व्यवसायिक आयुष्यासह तिनं खासगी आयुष्यातही समतोल साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, यादरम्यन तिच्या मुलीला तिच्या वडिलांची उणीव जाणवायची. याबाबत तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. मेघा धाडे व तिची मुलगी साक्षी पावसकर यांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत सांगितलं आहे. मेघाची लेक साक्षी याबाबत म्हणाली, “आईनं मला कधीच कशाची कमतरता भासू दिली नाही. जरी मला वडील नसले तरी तिनं तिला शक्य त्या सर्व गोष्टी माझ्यासाठी केल्या.” त्यानंतर मेघा म्हणाली, “एकदा तिनं मला या गोष्टीची जाणीव करून दिली की, आता कोणीतरी आपल्या घरी पाहिजे.” यावेळी मेघानं लेकीचा एक किस्सा सांगितला आहे.
मेघा धाडेच्या लेकीला जाणवायची वडिलांची उणीव
मेघा म्हणाली, “आम्ही पूर्वी कांदिवलीमध्ये राहायचो आणि ती इमारत बरीच मोठी होती. खूप विंग्स (Wing) होत्या त्या इमारतीला. तेव्हा ती ५-६ वर्षांची होती. त्यावेळी मी ‘सुपरस्टार’ चित्रपटाचं चित्रीकरण करत होते. साक्षी त्यावेळी हॉस्टेलमध्ये राहायची. मी तिला चार वर्षांची असतानाच तिथे टाकलेलं. ती थोड्या वेळासाठी सुट्यांमध्ये घरी आलेली. तेव्हा ती मला एकदा म्हणालेली, इकडे जे (J) विंगमध्ये असं कोणीतरी असेल ना ज्यांच्याकडे मुलगी नाहीये किंवा बायको नाहीये. ते माझे पप्पा होऊ शकतात का?”.
मेघा धाडे साक्षीला दिलेल्या उत्तराबद्दल पुढे म्हणाली, “तेव्हा मी तिला नाही, असं होऊ शकत नाही, असं सांगितलं होतं. तेव्हा मला जाणवलं की, तिला असं कोणीतरी हवं आहे, जो आमच्या आयुष्यात असल्यानं आम्हाला त्याची मदत होईल. मला जाणवलं की, तिला वडिलांची गरज आहे. तेव्हा मी तिला म्हटलं की, आता कोणीच नाहीये; पण मी तुला वचन देते की, मी तुझ्यासाठी चांगले वडील शोधेन. मग तुझेही बाबा असतील आणि ते खूप चांगले असतील. आता मला असं वाटतं की, मी तिच्यासाठी चांगला बाबा शोधला आहे”
मुलाखतीमध्ये पुढे साक्षीला “तू आता तुझ्या आईच्या जास्त जवळ आहे की बाबांच्या”, असा प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावर ती म्हणाली, “मी दोघांच्याही तितकीच जवळ आहे. माझ्यासाठी दोघेही समान आहेत. फक्त बाबा मला खूप स्वतंत्र्य देतात. ते म्हणतात की, तुला हवं ते कर. जे आवडतं, ते तू कर.”
मेघानं २०१५ रोजी आदित्य पावसकरशी लग्न केलं. आदित्य यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे; तर मेघालासुद्धा या लग्नापूर्वी एक मुलगी होती. याबाबत अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं. मेघानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिची मुलगीसुद्धा लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं म्हटलं आहे. तिनं अभिनेते अनुपम खेर यांच्या अभिनय शाळेतून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे.