‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे मिलिंद गवळी सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे अनुभव, किस्से वा काही खास आठवणी शेअर करतात. अशातच त्यांनी हिंदी टेलीव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली गांगुलीचे कौतुक केलं आहे. रुपाली गांगुलीचा काल (३० एप्रिल) रोजी वाढदिवस झाला. या वाढदिवसाला मिलिंद गवळी पत्नीबरोबर गेले होते. या दिवसाची खास आठवण म्हणून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “अभिनेत्री रूपाली गांगुली यांचा वाढदिवस होता, अंधेरी इथे तो साजरा करण्यात आला. रुपाली यांचं आमंत्रण आल्यावर मला खूप आनंद झाला. माझ्यासाठी रुपाली गांगुलीसारखे खूपच कमी कलाकार आहेत, जे उत्तम अभिनय जाणतात आणि तो अभिनय करण्यासाठी खूपच प्रामाणिक काम करतात. खरंतर आम्ही एकत्र कधीच काम केलं नाही, पण कोविडच्या काळात लॉकडाऊनमुळे आम्हाला सगळ्यांना सिलवासा इथे शूटिंगला जावं लागलं होतं. त्यावेळेस ‘अनुपमा’ मालिकेचं आणि ‘आई कुठे काय करते’ मालिकेचे शूटिंग अगदी बाजुबाजूला होतं. “
यापुढे त्यांनी म्हटलं की, “दोन्ही मालिकेचे निर्माते राजन शाहीच होते. त्यावेळेस जवळजवळ ५० दिवस येता-जाता एकमेकांच्या सेटवर आम्ही डोकावत असू आणि एकमेकांचं काम बघत असू. तिथे रुपाली गांगुली यांचं काम बघून मी खरंच खूप भारावून गेलो होतो. मालिका करणं कलाकारांसाठी सोपं नसतं. त्यात जर ती हिंदी मालिका असेल तर, त्या मालिकेतल्या मुख्य कलाकारावर खूप दडपण आणि जबाबदारी असते. ती जबाबदारी रुपाली गांगुली उत्तम पद्धतीने पार पाडत होत्या आणि आजही पार पाडत आहेत.”
यानंतर मिलिंद गवळींनी रुपालीचं कौतुक करत म्हटलं आहे की, “दिवसभर उत्तम अभिनय करून थकून जायचं. पण संध्याकाळी जेवायला आम्ही सगळे कलाकार एकत्र त्या रिसॉर्टच्या मेसमध्ये भेटायचो. तेव्हा त्यांचा चेहरा हसमुख असायचा, लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या लेकापासून लांब राहावं लागत होतं. त्याच्या आठवणीने त्या दुःखी व्हायच्या. पण त्याचा त्यांच्या कामावर कधीही परिणाम झाला नाही. आज खरंच इतक्या प्रोफेशनल पद्धतीने त्या काम करतात म्हणून कदाचित ‘अनुपमा’ ही मालिका सहा वर्षांनंतरही उत्तम सुरू आहे आणि आजही लोकप्रिय आहे.”
यानंतर मिलिंद गवळी म्हणतात की, “रुपाली यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना भेटून आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटून मला व दिपाला खूप आनंद झाला, रूपालीजींची आई मला बघताच क्षणी म्हणाल्या “अरे वा अनिरुद्ध तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत सुद्धा मी तुमचं काम बघितलं आहे. खूप छान काम करता तुम्ही.” यापुढे मिलिंद गवळी यांनी पुन्हा एकदा रुपाली गांगुलीला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या.