Milind Gawali shares post on occasion of Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थी म्हणजे आनंद, उत्साहाचा सण. सर्व जण एकत्र येत हा सण साजरा करतात. सामान्यांपासून ते कलाकार मंडळीपर्यंत अनेक जण श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतात.
आता अभिनेते मिलिंद गवळी यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एक व्हिडीओ शेअर करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला ते पारंपरिक वेशभूषेत गणपतीचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत.
पुढे मिलिंद गवळी या व्हिडीओमध्ये म्हणतात, “काय मग? यंदाचा आपला गणपती बाप्पाचा उत्सव जल्लोषात आहे ना? मग म्हणा, गणपती बाप्पा मोरया.”
मिलिंद गवळी यांची खास पोस्ट
श्री गणेशाच्या आगमनाने वातावरणात सकारात्मकता येईल, अशा आशयची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. मिलिंद गवळी यांनी लिहिले, “आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥ हरी पाहिला रे हरी पाहिला रे। संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसिद्ध अभंग, ज्याचा अर्थ आहे-आजचा दिवस अत्यंत शुभ, आनंददायी आणि दिव्य अनुभूतीनं समृद्ध आहे. कारण- आज मी हरीचा म्हणजेच विठ्ठलाचा साक्षात्कार अनुभवतो आहे.”
“तसेच आपल्यासाठीसुद्धा आजचा दिवस सोनियाचा आहे, आनंदाचा आहे. परमेश्वराच्या अनुभूतीनं भरलेला असा हा विशेष दिवस आहे. कारण- आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आजच्या दिवशी घरोघरी साक्षात परमेश्वर गणपती बाप्पाच्या रूपानं आपल्याकडे विराजमान झाले आहेत.”
“आजपासून जितके दिवस गणपती बाप्पा विराजमान होणार आहे, तितके दिवस मनामधली नकारात्मकता, भीती, वाईट विचार, मानसिक अशांती, घरातला व परिसरातला वास्तुदोष या सगळ्याचा नाश होणार आणि घरात सुख, शांती, समाधानी वातावरण, आपुलकी आणि प्रेम निर्माण होणार.”
“गणपती बाप्पा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवणार. बाप्पा विघ्नहर्ता, संकटमोचक आणि मंगलकर्ता आहे, ज्यामुळे भक्तांचा आत्मविश्वास वाढतो. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. ताण-तणाव आजार नाहीसे होतात.”
“भाविक बाप्पाच्या श्रद्धेपोटी किंवा भीतीपोटी म्हणा, दारू आणि मांसाहार पूर्णपणे बंद करतात. हीसुद्धा एक सकारात्मक गोष्ट या काळामध्ये घडत असते. फक्त दूर्वा, जास्वंदाची फुलं, सिंदूर, मोदक, श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप, गणपती अथर्वशीर्ष, आरत्या यांनी बाप्पा प्रसन्न होत असतो. आजपासून राग, रुसवे-फुगवे, द्वेष सगळं सोडून एकमेकांच्या भेटीगाठी घ्यायच्या असतात. आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी बाप्पा स्वतः विराजमान होतात.”
“परंपरेप्रमाणे काहींकडे गणपती बसवतात, तर काहींकडे बसवत नाहीत. काही फारच मनापासून बाप्पाची पूजा-अर्चा, सेवा करतात, काही जण सवयीप्रमाणे करत असतात. गणपती बाप्पाची तुम्ही कशीही आराधना केलीत तरी तो तुम्हाला पावतोच. वेडी वाकडी पूजा असली तरीसुद्धा ती मनापासून केली तर ती बाप्पापर्यंत पोहोचतेच.”
“बाप्पा आपल्या आयुष्याची वाटचाल सोपी, सुखमय, आनंददायी नक्कीच करतो. फक्त श्रद्धा असणं गरजेचं आहे. माझी आई म्हणायची की, बाप्पा हा अशिक्षित, अडाणी, भोळ्या भाबड्या माणसांना लगेचच पावतो. कारण- त्यांच्याकडे निस्सीम विश्वास आणि श्रद्धा असते. जे अति हुशार, अति शहाणे, आपण ज्ञानी, हुशार आहोत, असे दाखवणारे असतात, त्यांनासुद्धा बाप्पा पावतो; पण जरा उशिराच पावतो.”
पुढे त्यांनी सर्वांना शुभेच्छा देत लिहिले, “चला तर मग गणेश उत्सवाच्या मंगलमय वातावरणामध्ये रमून जाऊया. एकमेकांना भेटूया. शुभेच्छा, आशीर्वाद देऊया. एकमेकांकडे जाऊन बाप्पाचे दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.”