Tharla Tar Mag Fame Monika Dabade Talks About Her Daughter : अभिनेत्री मोनिका दबाडे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली. मोनिकाने ती गरोदर असल्याने काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. परंतु, काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा तिच्या कामावर रुजू झाली आहे.

मोनिका सोशल मीडियावर सक्रिय असते, तर तिचा तिथे मोठा चाहतावर्ग आहे. ती तिच्या ब्लॉगमार्फत तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी, सेटवरील गमती जमती प्रेक्षकांसह शेअर करत असते. आता अभिनेत्री तिच्या लेकीबरोबरचे फोटो व व्हिडीओसुद्धा यामार्फत शेअर करताना दिसते. परंतु, असं असलं तरी अद्याप तिने तिच्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही.

मोनिकाचे ब्लॉग बघणारे अनेकजण तिला ती तिच्या लेकीचा वृंदाचा चेहरा कधी दाखवणार याबाबत विचारत असल्याचं तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमधून सांगितलं आहे. तिने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली होती. यामध्ये मोनिकाने अजून तिच्या लेकीचा चेहरा का दाखवलेला नाही याबाबत सांगितलं आहे.

मोनिका म्हणाली, “दिवाळीनंतर मी तिचा चेहरा लोकांना दाखवणार आहे, कारण यासाठी अनेकांनी मला विचारलं होतं. त्याचबरोबर मी तिच्याबरोबर काय काय करते, काय नवीन गोष्टी तिला शिकवते. याबाबत ब्लॉग करणार आहे.” पुढे यामध्ये तिला “अनेक जण तुला वृंदाचा चेहरा कधी दाखवणार याबाबत विचारत असतात, याचा तुला त्रास होतो का” असं विचारण्यात आलेलं.

मोनिका याबद्दल म्हणाली, “मला याचा त्रास होत नाही, पण गंमत याची वाटते की तिने अजून मानही धरलेली नाही. मग असं असताना तिचा चेहरा दाखवण्यात काय अर्थ आहे. जर ती छान बसत असती, स्माईल करत असती तर बाळाचा चेहरा बघायला छान वाटतं. अजून ती नीट बसतही नाही, त्यामुळे मी कसा तुम्हाला तिचा चेहरा दाखवणार.”

मोनिका पुढे म्हणाली, “मी स्वत:ला सेलिब्रिटी वगैरे समजत नाही. इतर लोकांपेक्षा मालिकेमुळे घराघरात मी जास्त ओळखली जाते एवढंच. मी अजिबात स्वत:ला सेलिब्रिटी म्हणून घेत नाही, कारण माझ्या नावावर जर पाहिलं तर खूप मोठी फिल्म आहे किंवा एक अख्खी सीरियल आहे, अशी काही गोष्टच नाहीये; याची मला जाणीव आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो की, मी अजून खूप कामही केलेलं नाहीये. मोठी सेलिब्रिटी नसतानाही का लोकांना वृंदाचा चेहरा पाहायचा आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कदाचित ब्लॉगमुळे असेल, ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळ असेल, कारण ती खूप मोठी मालिका आहे. त्यातील प्रत्येक पात्र खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे कदाचित लोकांना उत्सुकता असेल. पण, लवकरच तिचा सरळ बसली असतानाचा, स्माईल करत असतानाचा फोटो मी दाखवणार आहे. दिवाळीमध्ये किंवा दिवाळीनंतर जेव्हा ती छान हसायला लागेल ना तेव्हा मी तिचा फोटो नक्की दाखवेन आणि याचा मला अजिबात काही त्रास वगैरे होत नाही”.