Mrunal Kulkarni Talk’s About Daughter In Law Shivani Rangole : शिवानी रांगोळे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अशातच आता अभिनेत्री लवकरच एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती व विराजस कुलकर्णी जोडीने एकत्र सहभाग घेणार आहेत. या कार्यक्रमाच्या सेटवर पहिल्यांदाच शिवानीची आई आली होती, याबद्दल तिच्या सासुबाई मृणाल कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.

मृणाल कुलकर्णी व शिवानीच्या आई राधा रांगोळे यांनी नुकतीच ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्या कधीच यापूर्वी शिवानीच्या मालिकांच्या सेटवर गेल्या नसल्याचं म्हटलं आहे. शिवानीच्या आई यामध्ये म्हणाल्या, “मी येणार नव्हते, पण मृणालने मला खूप आग्रह केला. मुलांना याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यांनी याबद्दल अपेक्षाही केली नव्हती की मी येईन असं, त्यामुळे त्यांना जास्त आनंद झाला.” मृणाल कुलकर्णी व राधा रोंगोळे यांनी आगामी कार्यक्रम ‘आम्ही सारे खवय्ये’च्या सेटवर हजेरी लावली होती.

आईला ‘आम्ही सारे खवय्ये’च्या सेटवर पाहून शिवानी रांगोळेला अश्रू अनावर

मृणाल कुलकर्णी पुढे म्हणाल्या, “राधा आजपर्यंत शिवानीबरोबर कुठेही गेलेली नाही. प्रत्येकवेळेला ती नाही म्हणत होती, त्यामुळे मी येईन याच्यात काही विशेष नव्हतं. शिवानी व विराजसला अंदाज होताच की घरून कोणीतरी येणार म्हणजे मीच येईन. पण राधा आली म्हणून सगळ्यांना आनंद झाला. राधाला पाहून शिवानी रडायलाच लागली. तिला रडताना पाहिल्यानंतर ही पण रडायला लागली.”

शिवानीच्या आई पुढे म्हणाल्या, “मी कधीच कुठल्या पुरस्कार सोहळ्यातही जात नाही. अगदी खूप आग्रह केला तर मालिका संपत आली असेल, शेवटचं काही शूटिंग असेल तरच तिच्या सेटवर जाते.”

शिवानी व विराजस कुलकर्णी लवकरच ‘आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला’ यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये ते वेगवेगळे पदार्थ बनवताना पाहायला मिळणार आहेत. शिवानी व विराजससह यमध्ये हेमंत ढोमे-क्षीती जोग, अभिजीत खांडकेकर-सुखदा खांडकेकर, मृण्मयी देशपांडे-स्वप्नील राव ही जोडपी झळकणार आहेत. येत्या ९ ऑगस्टपासून हा कार्यक्रम शनिवार, रविवारी दुपारी १ वाजता प्रसारित होणार आहे. बऱ्याच दिवसांनी ‘आम्ही सारे खवय्ये’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दरम्यान, शिवानी यापूर्वी ‘झी मराठी’वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतून झळकली होती. यामध्ये तिने मुख्य अभिनेत्री अक्षराची भूमिका साकारलेली. यातील तिची व अभिनेता ह्रषिकेश शैलाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.