Priya Marathe Passed Away:  सोशल मीडिया असे माध्यम आहे, ज्याचा वापर सामान्यांपासून ते प्रसिद्ध, तज्ज्ञ व्यक्तींपर्यंत, गरिबापासून श्रीमंतांपर्यंत, लहानापासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण करतात. अनेक जण सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त करतात.

सोशल मीडियावर एखाद्याने एखादी पोस्ट शेअर केली किंवा व्हिडीओ शेअर केला, तर त्यावर कोणालाही कमेंट्स करीत स्वत:चे मत नोंदवता येते. त्यामुळे अनेकदा कौतुक होते; तर काही वेळा मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगदेखील केले जाते. बऱ्याचदा वाईट भाषेत कमेंट्स केल्या जातात, अपमान केला जातो.

“फार कमी गोष्टींनी मी इतकी अस्वस्थ…”

आता अभिनेत्री प्रिया मराठेची निधनानंतर अभिनेत्री मुग्धा गोडबोले-रानडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, “जुलै २०२३ मध्ये प्रियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये ती असं म्हणाली होती की, प्रकृतीच्या कारणामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेतून मी बाहेर पडते आहे. चॅनेलनेही आपल्या ऑफिशियल पेजवर तो व्हिडीओ शेअर केला.”

“प्रियाला कॅन्सर झाला होता. तरीही ती काही काळ शूटिंग करीत होती; पण ती त्या ट्रीटमेंटमुळे थकत होती. त्या मालिकेत ती नकारात्मक भूमिका करीत होती. त्याचा परिणाम म्हणून असेल; पण त्या व्हिडीओखाली अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स लिहिल्या होत्या. इथे उच्चारता येणार नाहीत अशा त्या कमेंट्स होत्या. काय वाटलं असेल तिला?,” या शब्दांत मुग्धा गोडबोले-रानडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “प्रिया गेली, दोन वर्षं झगडून थकली. त्याबद्दल अतोनात दुःख आहे. फार कमी गोष्टींनी मी इतकी अस्वस्थ होते. एरवी तशी मी टगी आहे; पण प्रिया फार गोड मुलगी होती. फार सज्जन. राहून राहून पुन्हा तोच प्रश्न पडतो. लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट का लिहितात? कलाकाराच्या कामाची पावती वगैरे म्हणायला मुळात आता प्रेक्षक इतके भाबडे राहिले आहेत का? कलाकार, त्याचं काम, प्रतिमा यातला फरक न कळण्याइतके?”

“स्वतःमधलं काहीतरी घाणेरडं बाहेर काढायचा तो आता मार्ग झाला आहे. एकानं सुरू केलं की, सगळे सुरू होतात. विष पसरत जातं. असो! प्रियाचं निधन ही फार फार दुर्दैवी घटना”, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मराठी-हिंदी मालिका विश्वामध्ये लोकप्रिय असलेल्या प्रिया मराठेचे ३८ व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी भावना व्यक्त केल्या आहेत.