मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने २१ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. चिपळूणमध्ये दोघांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक गायक व कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाअगोदरच्या विधींचीही चांगलीच चर्चा रंगली होती. ग्रहमखपासून हळदीपर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अत्यंत साध्या आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या लग्नापूर्वीचे विधी पार पडले. लग्नातही दोघांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते. दोघांच्या साध्या लूकचे सगळीकडे कौतुक झाले होते.
हेही वाचा- स्वानंदी टिकेकर-आशीष देशपांडेने ‘या’ हटक्या नावांनी सेव्ह केलेत एकमेकांचे नंबर, खुलासा करीत म्हणाले…
लग्नानंतर मुग्धा आनंदाने संसार करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मुग्धाच्या सासऱी दत्तजयंतीनिमित्त भजनाचा कार्यक्रम पार पडला. मुग्धा व प्रथमेशने या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आता लग्नानंतर मुग्धा-प्रथमेश गाण्याच्या मैफिलीत एकत्र गाताना दिसत आहे. मुग्धाने आपल्या सोशल मीडियावरून या मैफिलीची झलकही शेअर केली आहे. मुग्धाने प्रथमेशबरोबरचा तिचा सेल्फी शेअर करीत ‘लग्नानंतरची पहिली मैफील, तीही एकत्र’ अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोवरून पुण्यातील गाण्याच्या कार्यक्रमात या दोघांनीही हजेरी लावली असल्याचे दिसून येत आहे.

‘सारेगमप लिटील चॅम्प्स’मधून मुग्धा व प्रथमेश घराघरांत पोहोचले. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करीत आपल्या नात्याची कबुली दिली होती. तेव्हापासून दोघांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. आता नुकतीच दोघांनी लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.