Munjya Fame Actress Was The First Choise For Anupama : ‘अनुपमा’ हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. यामध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रूपाली गांगुली ‘अनुपमा’ची मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का ‘अनुपमा’साठी रूपाली गांगुली नाही तर ‘मुंज्या’ फेम अभिनेत्रीला पहिली पसंती होती.

रूपाली गांगुली हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती तिच्या ‘अनुपमा’ मालिकेतील भूमिकेमुळे चर्चेत आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का, ज्या भूमिकेमुळे रूपाली गांगुली पुन्हा चर्चेत आली आणि घराघरांत पोहोचली, त्या भूमिकेसाठी ती पहिली पसंती नव्हती; तर तिच्या आधी एका वेगळ्याच अभिनेत्रीला विचारणा झालेली, परंतु तिने नकार दिला होता.

रूपालीच्या आधी अनुपमाच्या भूमिकेसाठी ‘मुंज्या’ फेम अभिनेत्री मोना सिंहला विचारणा झाली होती. याबद्दल स्वत: मोनाने सांगितलं आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार ती म्हणाली, “मला काही वर्षांपूर्वी टीव्ही शो अनुपमासाठी विचारणा झालेली. पण, तेव्हा मी ठरवलं होतं की मला टीव्ही शो करायचा नाही, म्हणून मी त्या शोसाठी नकार दिला.”

मोना सिंह पुढे म्हणाली, “माझ्यासाठी भूमिका कशी आहे हे महत्त्वाचं ठरतं. मला त्या भूमिकेतून आनंद मिळतोय का हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, मला नंतर पश्चाताप नकोय.” मोना सिंहने ‘मुंज्या’ या हॉरर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. मोना सिंहने रूपालीबद्दलही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “मी रूपाली आणि राजन शाही यांच्यासाठी आनंदी आहे. ते खूप छान काम करत आहेत. मला वाटतं की ही भूमिका तिच्यासाठी बनलेली आणि ती ही भूमिका उत्तमरित्या साकारत आहे.”

‘अनुपमा’मध्ये रूपाली गांगुली गेली ५ वर्ष अनुपमा ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अनेक ट्विस्ट येत असतात.