Muramba Upcoming Twist: ‘मुरांबा ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री शिवानी मुंढेकर प्रमुख भूमिकांत आहेत. अक्षय आणि रमा अशी त्यांच्या पात्रांची नावे आहेत.

मालिकेच्या सुरुवातीपासूनच अक्षय आण रमा यांच्यात होणारी छोटी मोठी भांडणे, त्यानंतर मनाविरुद्ध झालेले लग्न, लग्नानंतर हळहळू झालेली मैत्री आणि मग एकमेकांचे स्वभाव आवडायला लागल्यानंतर त्यांच्यातील प्रेम यांमुळे रमा आणि अक्षय ही लोकप्रिय जोडी ठरली. त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. त्यांच्या आयुष्यात रेवा होती. जी त्यांना सतत त्रास देत होती. मात्र, रमा आणि अक्षयने एकत्र राहून तिच्या कट कारस्थानाचा सामना केला.

त्यानंतर त्यांच्या आयुष्यात माही आली. माहीच्या येण्याने अक्षय आणि रमा दुरावले. इरावती आत्यामुळे त्यांच्यात अंतर निर्माण झाले. गेली सात वर्षे रमा आणि अक्षय एकमेकांपासून दूर आहेत. फक्त ते दोघेच नाहीत, तर रमा तिच्या मुलीपासून म्हणजेच आरोहीपासूनदेखील सात वर्षे दूर आहे. ती पाचगणीत राहत आहे. आता मात्र या मायलेकींची भेट होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

सात वर्षानंतर होणार माय-लेकीची भेट

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर मुरांबा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की आरोही डोळे बंद करून हात जोडून प्रार्थना करत आहे. ती म्हणते, लीटल स्टार, मला माझ्या आईला भेटायचं आहे. तितक्यात समोरुन रमा येते. तिने परीसारखी वेशभूषा केली आहे. पांढरा ड्रेस, हातात जादूची छडी, ड्रेसला पांढरे पंख असा रुपात ती दिसत आहे. रमाला अशा रुपात पाहून आरोही तिच्याकडे धावत येते. ती तिला म्हणते,”फेरी परी. तिच्या हातात चांदणीसुद्धा आहे. म्हणजे हीच माझी आई. असे म्हणून आरोही रमाला जाऊन मिठी मारते. तिला आई म्हणून हाक मारते.

पुढे भावुक होत ती रमाला म्हणते, “परी, तू माझी आई आहेस ना? माझ्यासाठी तू परत आली आहेस ना?”, असे म्हणत ती रमाच्या चेहऱ्यावरुन प्रेमाने हात फिरवते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अशी होणार माय-लेकीची भेट”, अशी कॅप्शन दिली आहे.

आता रमा आणि आरोहीची भेट झाल्यानंतर रमा तिच्या मुलीला ओळखू शकणार का, अक्षय आणि रमा समोरासमोर आल्यानंतर काय होणार, रमाची आणि अक्षयची भेट झाल्यानंतर इरावती काय करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.